पुणे : ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नवी दिल्लीमध्ये यंदा होत आहे. येथील तालकटोरा स्टेडियममध्ये हे संमेलन होणार असून, त्यामध्ये तीन हजार लोकांना बसण्याची सोय आहे. गोलाकार असे स्टेडियम आहे. मधोमध व्यासपीठ उभारण्यात येईल. पुस्तकांचे स्टॉल्स स्टेडियमच्या बाहेर प्रांगणात असतील. संमेलनाच्या आदल्या दिवशी संमेलनाच्या तयारीसाठी स्टेडियम उपलब्ध होणार आहे.
आपल्या मायमराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला आणि याच पार्श्वभूमीवर, मायमराठीचा जागर करण्यासाठी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे २१, २२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ या तीन दिवसांत होत आहे. भाषा, संस्कृती, राष्ट्रभावना, मानवता आणि एकात्मता यांचा आगळा मिलाफ यानिमित्ताने महाराष्ट्र वा देशातीलच नव्हे, अवघ्या जगातील साहित्यरसिक देशाच्या राजधानीत अनुभवणार आहेत.
व्यासपीठ एका बाजूला असेल !
स्टेडियम गोलाकार आहे. त्यामुळे मधोमध असलेल्या जागेत एका बाजूला व्यासपीठ उभे केले जाईल. त्यामुळे त्या व्यासपीठाच्या मागील खुर्च्यां रिकाम्या असतील. साधारण दोन-तीनशे लोकांना तिथे बसता येणार नाही. अडीच हजार लोकांना पाहता येईल, अशी सोय होईल.
तालकटोरा ठिकाणच का ?
नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमला देखील ऐतिहासिक महत्त्व आहे. मराठे पानीपतचे युध्द लढले तेव्हा याच ठिकाणावर तळ ठोकून होते. त्यामुळे त्या भूमिला ऐतिहासिक महत्त्व आहे. त्या ठिकाणी २८ नोव्हेंबर १९७४ रोजी तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी स्टेडियमचे उद्घाटन केले होते. मराठ्यांनी तालकटोरा भागात आपला पराक्रम गाजवला, म्हणून त्याच ठिकाणी मराठीचा जागर होत आहे.
दिल्लीत संमेलना ठिकाणी कसे जाल ?
संमेलनाशी संबंधित माहिती, घडामोडी आणि संवादासाठी abmssdelhi.org या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे. नवी दिल्ली रेल्वे स्टेशनपासून तालकटोरा स्टेडियमला पोहोचण्यासाठी मेट्रो मार्गाचा वापर करता येतो. नवी दिल्ली मेट्रो स्टेशनपासून राजीव चौक (यलो लाईनने प्रवास करून) आणि त्यानंतर रामकृष्ण आश्रम/ आरके आश्रम पर्यंत जाता येईल.
दिल्लीमध्ये १९५४ साली मराठी साहित्य संमेलन झाले होते. तेव्हा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे संमेलनाध्यक्ष होते. त्यामुळे तब्बल ७७ वर्षानंतर दिल्लीत मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्यासाठी ऐतिहासिक जागा तालकटोरा निवडली. कारण या ठिकाणी मराठे पानीपतचे युध्द लढले तेव्हा तळ ठोकून होते. त्या जागेला ऐतिहासिक महत्त्व आहे. -संजय नहार, आयोजक, ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन