गडप होण्याची ३० गावांना भीती
By Admin | Updated: August 1, 2014 05:36 IST2014-08-01T05:36:52+5:302014-08-01T05:36:52+5:30
मावळात दरवर्षी धो धो पाऊस कोसळतो. लाल मातीच्या डोंगरावरून खळखळ पाणी वाहते. या पावसात आणि अशा धबधब्यात भिजायला सारेजण धावतात..

गडप होण्याची ३० गावांना भीती
सुभाष भांडे, कामशेत
मावळात दरवर्षी धो धो पाऊस कोसळतो. लाल मातीच्या डोंगरावरून खळखळ पाणी वाहते. या पावसात आणि अशा धबधब्यात भिजायला सारेजण धावतात...आता काही वर्षांपासून डोंगरच विकत घेऊन धनिकांनी मोठ मोठे प्रकल्प उभारण्यास सुरूवात केली आहे. परंतू, हे प्रकल्प डोंगराच्या पायथ्याशी असलेली ३० गावे ‘गडप’ करू शकतात. आपलीही स्थिती ‘मळीण’ सारखी होऊ शकते अशा भीतीने ग्रामस्थांची झोप उडाली आहे.
मावळच्या तीनही मावळापैकी पवन मावळात शिळीम, कादव, तुंग, तिकोणा, चावसर, पुसाणे, बऊर, नाणेमावळातील नेसावे, वेहेरगाव, शिलाटणे, वाकसई, मोरमारेवाडी, पाले, करंजगाव, जांभवली, साई, आंदरमावळातील कुसूर मोरमारेवाडी, दवणेवाडी, नवलाख उंब्रे, निगडे, वडेश्वर, फळणे, पारिंठेवाडी, किवळे, कशाळ, भोयरे, माऊ, कुसवली या गावांना धोका आहे.
या गावांना लागूनच मोठ मोठ डोंगर आहेत. किवळे, पाले, नाणे या गावांतून डोंगरावर जाण्यासाठी इनरकॉन या खासगी पवन विद्युत कंपनीने रस्ते तयार केले आहेत. त्यातून हजारो झाडांची कत्तल झाली आहे. नैसर्गिक ओढे, नाले, ओहोळ यांच्या दिशा बदलल्या आहेत. पाले, करंजगावच्या डोंगरावर खासगी बंगले उभारण्यात आल्याने तेथेही रस्ते बनले आहे. कादव, शिळीम, वाघेश्वर, तुंग, चावसर, तिकोणा, लोहगड या किल्यांखाली मोठ मोठी हॉटेल, रिसॉर्ट उभारले आहेत. यामुळे या भागात अधून मधून मातीची ढासळ होते. डोंगराच्या कडांना भेगा पडतात. अर्धवट तुटलेले कडेही या गावांना धोकादायक आहेत. या गावांत बहुसंख्य लोक आदिवासी व धनगर जमातीचे आहेत. काहींनी पूर्वीपासून थेट डोंगरावर घरे उभारली आहेत. डोंगर ढासळला अथवा कडा कोसळल्यास डोंगरावरील राहणाऱ्यांच्या जिवावर बेतू शकते.