जोडणीअभावी ३ टीएमसी पाणी गटारात

By Admin | Updated: September 3, 2015 03:24 IST2015-09-03T03:24:19+5:302015-09-03T03:24:19+5:30

तहान लागल्यावर विहीर खणण्याची आणि भागल्यावर ती विसरून जाण्याची सवय पुणे महापालिकेला लागली आहे. २०१३च्या टंचाईच्या परिस्थितीमधील शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहे

3 TMC water gutters due to lack of connection | जोडणीअभावी ३ टीएमसी पाणी गटारात

जोडणीअभावी ३ टीएमसी पाणी गटारात

पुणे : तहान लागल्यावर विहीर खणण्याची आणि भागल्यावर ती विसरून जाण्याची सवय पुणे महापालिकेला लागली आहे. २०१३च्या टंचाईच्या परिस्थितीमधील शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहे आणि उद्यानांमध्ये बोअरवेलचे पाणी वापरण्याचा प्रस्ताव कागदावरच राहिला आहे. विशेष म्हणजे, या कारणासाठी ठरविण्यात आलेल्या १०० पैकी ४० बोअरवेल खोदण्यातही आल्या. मात्र, स्वच्छतागृहांशी त्यांची जोडणी केली नाही. त्यामुळे वर्षात तब्बल अडीच ते तीन टीएमसी गटात जात आहे.
२०१३मध्ये टंचाईची परिस्थिती उद्भवली होती. या वेळी पालिकेच्या वतीने १०० बोअरवेल घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. शहरातील आमदारांबरोबरच सुरेश कलमाडी यांनी आपल्या खासदार निधीमधून १ कोटी रुपये दिले होते. या निधीमधून ४० बोअरवेल खोदल्याही गेल्या. मात्र, त्याच वर्षी शेवटच्या टप्यात चांगला पाऊस पडून धरणे भरली. गेल्या वर्षीही पाण्याची टंचाई जाणवली नाही. त्यामुळे हे काम मागे पडले. दोन वर्षांत स्वच्छतागृहांच्या टाकीशी जोडणी करणेही महापालिकेला जमलेले नाही.
पाणीपुरवठ्यासाठी चार धरणे असल्याने पुणे शहरातील बहुतांश सार्वजनिक स्वच्छतागृहे आणि उद्यानांमध्ये सध्या पिण्याचे पाणी वापरले जाते. सुमारे अडीच ते तीन टीएमसी पाणी यासाठी खर्च होते.

प्रत्यक्ष पिण्याच्या पाण्याची गरज ४ टीएमसीच
महापालिकेकडून दर वर्षी पुणेकरांना सुमारे १४ ते १५ टीएमसी पाणी दिले जात असले, तरी त्यातील केवळ ३ ते ४ टीएमसी पाणीच पिण्यासाठी वापरले जाते. उर्वरित १० टीएमसी पाण्याचे सांडपाणी होते. त्यामुळे पिण्याचे पाणी सांडपाण्यासाठी वापरणे कितपत योग्य आहे, हा सवाल उपस्थित केला जातो. पालिकेकडून हे पिण्याचे पाणी आणि वापरासाठीचे पाणी नागरिकांना देताना वेगळ्या यंत्रणा उभारल्यास पालिकेला दर वर्षी केवळ ४ ते ५ टीएमसी पाण्याचीच गरज भासेल. मात्र, पालिकेकडून याकडे गांभीर्याने पाहिले गेलेले नाही. एवढेच काय, तर सांडपाण्याचा पुन्हा वापर करता येईल, असा एकही प्रकल्प महापालिकेने गेल्या ६० वर्षांत उभारलेला नाही.

सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये सर्वाधिक पाण्याचा वापर
शहरातील नागरिकांना सार्वजनिक स्वच्छतागृहे महापालिकेने उपलब्ध करून दिलेली आहेत. यांची संख्या सुमारे १५,२९० आसनांची आहे. त्यात शौचालयांसह, स्वच्छतागृहांचा समावेश आहे. या ठिकाणी साफसाफाईपासून पाणीपुरवठ्यापर्यंत सरसकट पिण्याचे पाणी वापरले जाते. यासाठीच्या टाक्यांना मुख्य जलवाहिनीतून नळजोड देण्यात आलेले आहेत. मात्र, या पाण्यावर नियंत्रणासाठी कोठेही व्हॉल्व्ह, अथवा कॉक नसतात; त्यामुळे २४ तास हे पाणी वाया जाते. महापालिकेच्या एका सर्वेक्षणानुसार, या स्वच्छतागृहासाठी दर वर्षी सुमारे १ टीएमसी पाणी लागते. शहरात महापालिकेच्या सुमारे १००हून अधिक शाळा आणि ११०उद्याने आहेत. मात्र, या ठिकाणीही वापरासाठी पिण्याच्या पाण्याचाच आधार घेतला जात आहे.

पेठांचे शहर असलेल्या जुन्या पुण्यात तसेच नव्याने समाविष्ट झालेल्या गावठाणांमध्ये मोठ्या प्रमाणात खासगी तसेच सार्वजनिक पाण्याच्या विहिरी आहेत. त्यांत मोठ्या प्रमाणात पाणी आहे. अशा सुमारे ३९९ विहिरी आहेत. तसेच ४,९00 खासगी बोअरवेल आहेत. याशिवाय, पालिकेच्या मालकीच्या ५८८ बोअरवेल आहेत. मात्र, या सर्व स्रोतांचा पालिका काहीच उपयोग करीत नसल्याचे चित्र आहे. हे पाणी पिण्यासाठी वापरण्यायोग्य नसले, तरी शहरातील बांधकाम व्यावसायिकांना टँकरद्वारे उपलब्ध करून दिल्यास बांधकामासाठी केल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या वापरावर नियंत्रण आणणे पालिकेला शक्य असून, पाण्याची मोठी बचत होईल.

Web Title: 3 TMC water gutters due to lack of connection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.