सोळा वर्षांत २७ जणांचा मृत्यू

By Admin | Updated: February 15, 2017 01:18 IST2017-02-15T01:18:01+5:302017-02-15T01:18:01+5:30

जुन्नर तालुक्यात बिबट्यांचा प्रश्न सन २००० पासून सुरू आहे़ सन २०१६ पर्यंतच्या हल्ल्यात २७ व्यक्तींचा मृत्यू झाला, तर ८६ व्यक्ती जखमी

27 deaths in sixteen years | सोळा वर्षांत २७ जणांचा मृत्यू

सोळा वर्षांत २७ जणांचा मृत्यू

नारायणगाव : जुन्नर तालुक्यात बिबट्यांचा प्रश्न सन २००० पासून सुरू आहे़ सन २०१६ पर्यंतच्या हल्ल्यात २७ व्यक्तींचा मृत्यू झाला, तर ८६ व्यक्ती जखमी झालेले आहेत़ त्याचबरोबर २,८९३ जनावरे हल्ल्यात मृत्युमुखी पडले आहेत़
बिबट्यांच्या त्रासामुळे साधारणपणे १७७.५८ हेक्टर पिकांचे नुकसान झालेले आहे. आत्तापर्यंत मनुष्यहानी, पशुधन हानी व पिकहानी असे मिळून १ कोटी ५६ लाख २५ हजार २७ रुपये एवढी रक्कम अदा केली आहे़ तर फक्त नारायणगाव वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत १६ वर्षांत १३ जणांचा मृत्यू व १३ जण जखमी तसेच ५३८ जनावरे मृत्युमुखी पडलेले आहेत़ ही सर्व आकडेवारी वनविभागाच्या समोर असतानाही येथील महत्त्वाचे वनपरिक्षेत्र कार्यालय आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे हलविण्यात आले़ नारायणगाव परिक्षेत्र कार्यालयाच्या अंतर्गत सर्वाधिक मृत्युच्या घटना तसेच सर्वाधिक वावर असतानाही येथील कार्यालय हलविण्यात आले़ हे कार्यालय जात असताना कोणत्याही राजकीय व्यक्तीने त्यास खंबीरपणे विरोध केला नाही़ याबद्दल जुन्नर तालुक्यातील नागरिकांमध्ये राजकीय पुढाऱ्यांबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे़
जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगा धरणाचे काम सन २००० मध्ये सुरू झाल्यानंतर बिबट्यांचा प्रश्न सुरू झाला़ पिंपळगाव धरण हे माळशेज घाटाजवळ माळशेज परिसरातील डोंगर खोऱ्यात व वनपरिक्षेत्रामध्ये बिबट्यांचा वावर होता़ धरणाचे काम सुरू झाल्यानंतर अनेक महावृक्ष तोडले़ सतत होणाऱ्या मशिन्सच्या आवाजांमुळे बिबट्यांनी आपला हक्काचा परिसर सोडून जुन्नर तालुक्यातील उसाच्या क्षेत्रामध्ये वास्तव्यास येण्यास सुरूवात केली़ तेव्हापासून बिबट्यांचा प्रश्न तालुक्यासाठी मोठे आव्हान निर्माण झाले आहे़
जुन्नर वनविभागाअंतर्गत जुन्नर, नारायणगाव, ओतूर अशी तीन वनपरिक्षेत्र कार्यालये आहेत़ त्यापैकी नारायणगाव कार्यालयच का बंद केले़ नारायणगाव कार्यालय अंतर्गत ५६१७.६२० हेक्टर क्षेत्र व ३७ गावे, तर जुन्नर कार्यालयांतर्गत ७८९१.६८० हेक्टर क्षेत्र व ६९ गावे व ओतूर कार्यालया अंतर्गत ६९७०.९५० हेक्टर क्षेत्र २६ गावे असे एकूण २०४८०.२५ हेक्टर क्षेत्र आहे़ तर आंबेगाव तालुक्यात ९३५३.२५ हेक्टर क्षेत्र आहेत.़
सर्वांत जास्त बिबटे नारायणगाव वनपरिक्षेत्रात
ऊसतोडणीच्या वेळेस जुन्नर तालुक्यातील अनेक भागांत बिबट्यांची पिले आढळून आलेली आहेत़ वनविभागाने त्या पिलांना पुन्हा बिबट्याच्या सान्निध्यात सोडून दिले़ त्यामुळे संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने तालुक्यातील मनुष्यवस्तीतील राहणीमान धोक्यात आलेले आहे़ सध्या उसाच्या क्षेत्रात बिबट्यांचे वास्तव्य असून जशी ऊसतोडणी सुरू होईल, तसे बिबटे मनुष्यवस्तीकडे वास्तव्य वळू लागले आहेत़
ऊसतोडणी सुरू झाली आहे़ त्यामुळे हल्ले सुरू होणार आहेत़ सर्वांत जास्त बिबटे नारायणगाव वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गतच आहेत़ हे कार्यालय बंद केल्याने नारायणगाव वनविभागांतर्गत असलेले नारायणगाव, शिरोली, सावरगाव आदी परिसर जुन्नर वनविभागाला जोडला आहे़
तर खोडद, बेल्हा परिसर ओतूर वनविभाग कार्यालयाला जोडला आहे़ नारायणगाव वनपरिक्षेत्रात झालेल्या आत्तापर्यंतच्या घटना लक्षात घेऊन येथील वनकार्यालय पूर्ववत सुरू करावे, अशी मागणी केली आहे़
कार्यालय बंद करण्याचा निर्णय कसा घेतला? : सन २०१६ पर्यंत मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी, पशुधन हानी व पीकहानी मिळून १ कोटी ५६ लाख २५ हजार २७ रुपये ऐवढी रक्कम अदा केली आहे़ तर फक्त नारायणगाव वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत १६ वर्षांत १३ जणांचा मृत्यू व १३ जण जखमी तसेच ५३८ जनावरे मृत्युमुखी पडलेली आहेत. वनविभागाने नारायणगाव कार्यालया अंतर्गत होणाऱ्या हल्ल्यासाठी विशेष पथक तयार केले होते व त्यास खास बाब म्हणून मोबाईल व्हॅन देऊन गस्तीपथक तयार केले होते़ असे असताना हे वनपरिक्षेत्र कार्यालय बंद करण्याचा निर्णय कसा घेतला गेला? याबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे. जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता, आंबेगाव तालुक्यात हलविलेले कार्यालय हे चुकीच्या पद्धतीने हलविले आहे. कारण या तालुक्यात जुन्नर तालुक्यापेक्षा वनपरिक्षेत्र कमी आहे़, असे असताना नारायणगाव येथे २५ डिसेंबर १९६४ रोजी सुरू केले होते.
बिबट्यापेक्षा अधिकाऱ्यांची भीती जास्त
रांजणगाव सांडस : शिरूर तालुक्यास लाभलेली भीमा नदीची किनारपट्टी व लगत असलेले वनविभाग यामुळे जुन्नरच्या भागात आढळणाऱ्या बिबट्याने रांजणगाव सांडस परिसरात व आलेगाव पागा, नागरगाव परिसरातील ओढ्याच्या परिसरात वास्तव्य वाढले आहे. त्यामुळे येथे बिबट्यांची संख्या वाढली आहे. गावातील शेळ्या-मेंढ्यांवर बिबट्याचे हल्ले दिवसेंदिवस वाढत आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी बिबट्या पकडण्यासाठी मदत करीत नाहीत. बिबट्यापेक्षा वनविभागाच्या अधिकाऱ्यांची भीती जास्त वाटत आहे. मांडवगण फराटा-वडगाव रासाई परिसरातही बिबट्याचे वास्तव्य जास्त असून मोठी दहशत आहे. नदीकाठ बिबट्यामय झालेला आहे.
या भागात पिंजरे लावून मेंढपाळ व्यावसायिक तात्याबा पठारे, बापूराव कोळपे यांनी आपली शेळी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजऱ्यात दिली.
परंतु बिबट्याने पिंजऱ्यात न जाता शेळीचा फडशा पाडला. सायंकाळी मेंढ्या घरी नेताना अचानक ऊसशेतीतून बिबट्याने मेंढीवर झडप मारून शेतात ओढत नेले, त्या वेळी मेंढपाळांनी पाहिले. ही माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. मात्र पिंजरा नाही उपलब्ध झाल्यावर लावू, असे उत्तर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले.
तसेच बिबट्याच होता का? शेळी बिबट्याने खाल्ली तर दाखवा? असे हे अधिकारी मेंढपाळांना उलट प्रश्न विचारून वेळ मारून नेतात. त्यामुळे मेंढपाळ, शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

Web Title: 27 deaths in sixteen years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.