पुण्यात वर्षभरात २ हजार ६१९ जण बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:28 IST2021-01-08T04:28:56+5:302021-01-08T04:28:56+5:30
पुणे : घरात पतीशी वाद झाला, पत्नी ऐकत नाही. घरात कोणी आपल्याला महत्व देत नाही. मुले, सून सांभाळ करत ...

पुण्यात वर्षभरात २ हजार ६१९ जण बेपत्ता
पुणे : घरात पतीशी वाद झाला, पत्नी ऐकत नाही. घरात कोणी आपल्याला महत्व देत नाही. मुले, सून सांभाळ करत नाही, अशा विविध कारणांवरून घरातून निघून जाणाऱ्यांचे प्रमाण शहरात दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातील काही जण राग शांत झाल्यावर पुन्हा परत येतात. काही प्रकरणात तर मानसिक आजारामुळे मुले, तरुण, ज्येष्ठ नागरिक हे घर सोडून निघून जात असतात. पुण्यात गेल्या वर्षभरात पुण्यातून तब्बल २ हजार ६१९ जण घर सोडून निघून गेले होते. त्यापैकी १ हजार ६१९ जणांना शोधण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे.
लॉकडाऊनमध्ये सर्व जण घरात बंदिस्त असल्याने यावर्षी घरातून निघून जाणाऱ्यांचे प्रमाण गतवर्षीपेक्षा कमी आहे. शहरात ज्येष्ठ नागरिकांची संख्या वेगाने वाढत असून त्यातून अनेक नवीन समस्या पुढे येत आहे.
घरातून निघून जाणारे हे अनेकदा कोठेही फिरत असतात. वारजे येथील एक महिलेच पतीबरोबर भांडणे झाले. ती रागाच्या भरात घरातून बाहेर पडली. लॉकडाऊन सुरू असतानाही ती वेगवेगळ्या वाहनांतून प्रवास करीत थेट आसामपर्यंत पोचली होती. पोलिसांनी तिचा शोध घेऊन आसामहून परत पुण्यात आणले होते. अनेकदा घरातून रागावून बाहेर पडलेल्या तरुणी कुुंटणखान्याच्या शिकार होत असल्याचे रेड लाईट एरियात केलेल्या कारवाईतून पुढे आले आहे.
..
या कारणामुळे जातात घर सोडून
कुटुंबातील वादातून बहुतांश ज्येष्ठ नागरिक हे घरातून निघून जात असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर प्रेमविवाहाला घरातून होणारा विरोध, सासरी होणारा छळ, अशा कारणावरुन घर सोडून जाण्याचे प्रमाण अधिक आहे. प्रेमप्रकरणातून घर सोडून जाणार्या तरुणींचे त्यात प्रमाण अधिक आहे. त्याचबरोबर घरात होणारा छळ असह्य होणे, माहेरी आधार नसणे अशा कारणामुळे घर सोडून जाणार्या विवाहितेचे प्रमाण अधिक आहे.
...........
मिसिंग व्यक्तींच्या शोधासाठी स्वतंत्र सेल
घरातून निघून जाणार्या व्यक्तीचा शोध घेण्याबाबतचा प्राथमिक तपास स्थानिक पोलीस ठाण्यातून केला जातो. त्यांना तांत्रिक सहाय्य करण्यासाठी सामाजिक सुरक्षा विभागात स्वतंत्र मिसिंग सेल तयार करण्यात आला आहे. या सेल करुन शहरातील बेपत्ता व्यक्तींच्या तपासावर निगराणी ठेवली जाते.
बच्चनसिंग, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा.