रुंदीकरणासाठी २६१ वृक्षतोड
By Admin | Updated: February 27, 2017 00:05 IST2017-02-27T00:05:30+5:302017-02-27T00:05:30+5:30
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील देहूरोड ते निगडी दरम्यानच्या रस्त्याचे चौपदरीकरण काम महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळामार्फत गेल्या महिन्यात सुरू झाले

रुंदीकरणासाठी २६१ वृक्षतोड
देहूरोड : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील देहूरोड ते निगडी दरम्यानच्या रस्त्याचे चौपदरीकरण काम महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळामार्फत गेल्या महिन्यात सुरू झाले आहे. या भागातील रस्त्याच्या रुंदीकरणासाठी अडथळा ठरणारे एकूण २६१ वृक्ष या भागातील तोडून त्या बदल्यात ७८३ वृक्ष लावण्याचा प्रस्ताव रस्ते विकास महामंडळाने तयार केला आहे.
हा प्रस्ताव मान्यतेसाठी देहूरोड लष्करी मुख्यालय प्रमुखांकडे सादर करणार असून, कोणाही नागरिक अगर संस्थांना या प्रस्तावाबाबत आक्षेप असल्यास १ मार्चपर्यंत महामंडळाकडे योग्य कारणांसह तक्रार नोंदविता येणार आहे. देहूरोड कॅन्टोन्मेन्ट बोर्डाच्या हद्दीत निगडी ते देहूरोड येथील किमी २०.४०० ते २४.५०० तसेच २५.५७० ते २६.५४० दरम्यानच्या महामार्गालगत सध्या रस्ते विकास महामंडळाच्या मालकीची २६१ झाडे आहेत. महामार्ग रुंदीकरण करताना सदर झाडे तोडून टाकणार असून, तेथे एकास तीन याप्रमाणे एकूण ७८३ झाडे लावण्याचा प्रस्ताव रस्ते विकास महामंडळाने तयार केला आहे. १५ फेब्रुवारी २०१७ ची सूचना नियमानुसार सर्व २६१ वृक्षांवर चिकटविली आहे. या सूचनेनुसार महाराष्ट्र नागरिक क्षेत्र झाडांचे जतन सुधारणा अधिनियम १९७५ चे कलम ८/३ अन्वये महामंडळाने जाहीर सूचना दिली आहे. त्यानुसार या भागातील निलगिरी ७, रेन ट्री १२५, कडुलिंब ३४, वड ३६, जांभूळ २, आंबा ७, गुलमोहर २, बाभूळ ५, उंबर १ व चिंच ४२ अशी झाडे तोडून टाकण्याचा प्रस्ताव देहूरोड येथील स्टेशन कमांडर लष्करी छावणी यांच्यासमोर सादर करणार आहे. (वार्ताहर)
।देहूरोड कॅन्टोन्मेन्ट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय यांनी वृक्ष तोडणे व एकास तीन असे वृक्षारोपण करण्याची शिफारस केली आहे. याबाबत आक्षेप असल्यास नागरिक अगर संस्थांनी कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ, बांद्रा रिक्लेमेशन बस डेपो, मुंबई यांच्याकडे यांच्याकडे १ मार्चअखेर नोंदविता येणार आहे.