कारागृहात मोबाईलवरून अडीच हजार कॉल्स
By Admin | Updated: January 19, 2015 01:50 IST2015-01-19T01:50:42+5:302015-01-19T01:50:42+5:30
येरवडा कारागृहात सराईत गुन्हेगार मुन्ना दावल शेख याच्याकडे कारागृहात सापडलेल्या मोबाईलवरून अडीच हजार कॉल्स झाल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली

कारागृहात मोबाईलवरून अडीच हजार कॉल्स
दीपक जाधव, पुणे
येरवडा कारागृहात सराईत गुन्हेगार मुन्ना दावल शेख याच्याकडे कारागृहात सापडलेल्या मोबाईलवरून अडीच हजार कॉल्स झाल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. या प्रकरणी ८ महिन्यांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर ५ तुरुंगरक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. मात्र, शेखने मोबाईल आतमध्ये नेला कसा, कारागृहाच्या बराकीमध्ये मोबाईल चार्ज
करता येईल अशी व्यवस्था नसताना मोबाईल चार्ज कसा केला जायचा, यांसह अनेक प्रश्नांची उत्तरे अद्यापही कारागृह प्रशासनाने दिलेली नाहीत.
राज्यातील सर्वात मोठे कारागृह असलेल्या येरवडा कारागृहाच्या अंडासेलमध्ये (अतिदक्षता विभाग) दक्षता विभागाने मे २०१४ मध्ये घेतलेल्या झडतीमध्ये मुन्ना शेख याच्याकडे मोबाईल आढळून आल्याचे ‘लोकमत’ने उजेडात आणले होते. कारागृहाच्या पोलीस सुरक्षाव्यवस्थेला भेदून मोबाईल आतमध्ये नेण्यात आल्याचे उजेडात आल्याने सुरक्षाव्यवस्थेचे धिंडवडे निघाले होते. या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून या प्रकरणाची खात्यातंर्गत चौकशी करण्यात आली आहे.
शेख याच्याकडे सापडलेल्या मोबाईलवरून अडीच हजार कॉल्स करण्यात आले आहेत. शेख हा ४ महिने येरवडा कारागृहात होता, त्यापैकी २८ दिवस त्याला अंडासेलमध्ये ठेवण्यात आले
होते. अंडासेलच्या बराकीमध्ये असलेल्या स्वच्छतागृहात बसून त्याने मोबाईलवरून फोन कॉल्स केले असल्याची माहिती पुढे आली आहे.
त्याच्या टोळीतील साथीदार, नातेवाईक, मित्र यांना त्याने यावरून फोन केले आहेत. कारागृहात कैद्यांच्या बराकीमध्ये मोबाईल
चार्ज करण्याकरिता विजेची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. कारागृहातील तुरुंगरक्षकाकडून मोबाईलची बॅटरी चार्ज करून शेखला पुरविण्यात आल्यामुळेच तो मोबाईल वापरू शकला असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.