चोवीस तास पाण्यासाठी २४० कोटींचा आराखडा
By Admin | Updated: June 25, 2016 00:28 IST2016-06-25T00:28:41+5:302016-06-25T00:28:41+5:30
अमृत योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या २४ तास पाणीपुरवठ्याच्या २४० कोटींच्या आराखड्यास मंजुरी दिली आहे. पाणीपुरवठा वितरणव्यवस्था आणि बागा-उद्यान प्रकल्पांसाठी

चोवीस तास पाण्यासाठी २४० कोटींचा आराखडा
पिंपरी : अमृत योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या २४ तास पाणीपुरवठ्याच्या २४० कोटींच्या आराखड्यास मंजुरी दिली आहे. पाणीपुरवठा वितरणव्यवस्था आणि बागा-उद्यान प्रकल्पांसाठी शासनाने पहिला हप्ता महापालिकेला दिला आहे. १२ कोटी १५ लाखांचे अनुदान महापालिकेला मिळाले आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या प्रकल्पामुळे २०१९ मध्ये शहरात २४ तास पाणीपुरवठा होईल, असा दावाही केला.
अमृृत योजनेस शनिवारी वर्ष पूर्ण होत आहे. त्या निमित्ताने योजनेचा आढावा घेण्यात आला. या वेळी सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम, सह शहर अभियंता रवींद्र दुधेकर, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, संजय कांबळे, मुख्य माहिती व तंत्रज्ञानप्रमुख निळकंठ पोमण उपस्थित होते.
तानाजी शिंदे म्हणाले, ‘‘२५ जून २०१५ रोजी अमृत अभियानाची सुरुवात झाली. सहभागी शहरामध्ये समाधानकारक पाणीपुरवठा पुरविणे, आश्वासक विद्युतपुरवठा, घनकचरा व्यवस्थापनासह स्वच्छताविषयक व्यवस्था, प्रभावी नागरी दळणवळण, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, महिला आणि बालकांची सुरक्षितता, आरोग्य शिक्षण आदी पायाभूत सुविधा आवश्यक ठरविण्यात आल्या आहेत. या संदर्भातील सुधारणा आराखडा तयार करून शासनाकडे पाठविला आहे. पाणीपुरवठा व्यवस्था वितरणासाठी हजार कोटी, जलनिस्सारण प्रकल्पासाठी २८१ कोटी, बागा आणि उद्याने विकासासाठी १११ कोटी, पावसाळी गटार योजनेसाठी १३२९ कोटी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी ४७७ कोटी असा ३१९७ कोटींचा आराखडा शासनास पाठविला होता. त्यापैकी पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेचा विषयास मंजुरी दिली आहे. शहरातील ६० टक्के भागात २४ तास पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी केंद्र सरकारच्या अमृत योजनेमधून २४० लाखांचा निधी मंजूर झाला तसेच, आकुडीर्तील उद्यान विकसित करण्यासाठी एक कोटीचा निधीही मंजूर केला. (प्रतिनिधी)