Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमधील उत्तरकाशीतील धराली गावात मंगळवारी दुपारी ढगफुटीमुळे मोठा प्रलय आला. धराली गावात डोंगरावरून पाण्याचा पूर आणि मोठ्या प्रमाणात ढिगारा आला आणि ३४ सेकंदात संपूर्ण गाव वाहून गेले. आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. बुधवारी सकाळी बचाव-शोध मोहिमेदरम्यान एक मृतदेह आढळून आला. त्याची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. ढगफुटीनंतर ११ सैनिकांसह ५० हून अधिक लोक बेपत्ता आहेत. तर १५० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश आले आहे. या दुर्घनेनंतर महाराष्ट्रातील पर्यटकही बेपत्ता असून खासदार सुप्रिया सुळे यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांना बचाव कार्यात लक्ष घालण्याची मागणी केली आहे.
पावसामुळे उत्तराखंडमध्ये मोठी आपत्ती आली आहे. उत्तरकाशीच्या धराली गावात ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. धराली खीर गड येथे ढगफुटीनतर पाण्याची पातळी वाढल्याने धराली बाजाराच मोठं नुकसान झालं. विनाशकारी ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात मातीचे ढिगारे वाहत आले आणि सगळं गावं गाडलं गेले. यामुळे तिथल्या होमस्टेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. विनाशकारी प्रलयानंतर पुण्याच्या मंचर येथील २४ नागरिक उत्तराखंडमध्ये अडकले असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
"उत्तरकाशीमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे महाराष्ट्रातील पुणे येथील मंचर येथील सुमारे २४ नागरिक उत्तराखंडमध्ये अडकले आहेत. गेल्या २४ तासांपासून त्यांच्याशी कोणताही संपर्क झाला नसल्याने त्यांचे कुटुंबीय अत्यंत दुःखी आहेत. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर हस्तक्षेप करून त्यांना वाचवावे," असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं.
आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील १९९० सालच्या दहावीच्या बॅचमधील ८ पुरुष आणि ११ महिलांचा एक गट १ ऑगस्ट रोजी उत्तराखंडला गेला होता. त्यांच्याशी शेवटचा संपर्क गंगोत्री परिसरात झाला. त्यातील काही जणांनी गंगोत्रीमधील फोटो शेअर केले होते. मात्र त्यानंतर ढगफुटीची घटना घडली आणि त्यानंतर त्यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही.
दरम्यान, उत्तराखंडच्या दुर्घटनेत सोलापूरचे चार भाविक अडकले आहेत. धीरज बगले, समर्थ दासरी, विठ्ठल पुजारी व मल्हारी धोत्रे अशी चौघांची नावे आहेत. चौघेही हरिद्वार येथे दर्शनासाठी गेले होते. उत्तराखंडमध्ये एका गाडीतून त्यांनी प्रवास केला. चौघांचेही शेवटचे लोकेशन हे गंगोत्री पार्किंग दाखवण्यात आले होते. ५ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता त्यांचा कुटुंबियांशी संवाद झाला होता.