२३३ ग्रामपंचायती हगणदारीमुक्त!
By Admin | Updated: October 3, 2015 01:38 IST2015-10-03T01:38:32+5:302015-10-03T01:38:32+5:30
जिल्ह्यातील २३३ ग्रामपंचायतींत १०० टक्के शौचालये बांधण्यात आली असून, ती हगणदारीमुक्त झाली आहेत. आज झालेल्या ग्रामसभांत या गावांतील ग्रामस्थांनी तसे ठराव केले असून

२३३ ग्रामपंचायती हगणदारीमुक्त!
पुणे : जिल्ह्यातील २३३ ग्रामपंचायतींत १०० टक्के शौचालये बांधण्यात आली असून, ती हगणदारीमुक्त झाली आहेत. आज झालेल्या ग्रामसभांत या गावांतील ग्रामस्थांनी तसे ठराव केले असून, उघड्यावर न बसण्याची शपथ घेतली आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशात महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. पुणे जिल्हाही यात आघाडीवर राहण्यासाठी प्रयत्न करीत आहे. गेल्या वर्षी प्रशासनाला मुळशी तालुका हगणदारीमुक्त करण्यात यश आले आहे. यंदा भोर व वेल्हे तालुक्यात १00टक्के शौचालये बांधण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे.
शासनाने यंदा या अभियानांतर्गत सुरुवातीला दिलेले ५५ हजार २८७ शौचालयांचे उद्दिष्ट निम्मे केले आहे. असे असतानाही जिल्हा परिषद प्रशासन रोटरीच्या साह्याने जिल्ह्यात जास्तीत जास्त कुटुंबांना शौचालये बांधून देण्याच्या तयारीत आहे. गुरुवारी जिल्हा परिषदेत झालेल्या दक्षता समितीच्या बैैठकीत याचा आढावा घेण्यात आला. या वेळी पाणी आणि स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी राहुल साकोरे यांनी जिल्ह्यातील २३३ ग्रामपंचायती हगणदारीमुक्त झाल्याची घोषणा केली. या वेळी त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना आपापल्या कार्यक्षेत्रातील हगणदारीमुक्त ग्रामपंचायतीत २ आॅक्टोबरला होणाऱ्या ग्रामसभांत गाव हगणदारीमुक्त झाल्याचे ठराव घेण्याच्या सूचना केल्या होत्या.
त्यानुसार आज या २३३ गावांत ग्रामसभा घेऊन ठराव घेण्यात आले. हगणदारीमुक्त झालेल्या ग्रामपंचायतींत मुळशी तालुक्याने ९५ पैकी ९५ ग्रामपंचायतींत (१00 टक्के) शौचालये बांधून पहिला क्रमांक मिळवला आहे. तसेच जिल्ह्यातील तालुका हगणदारीमुक्त करण्यातही त्यांनी पहिला क्रमांक मिळवला आहे. त्यानंतर भोर तालुक्यात १५५ ग्रामपंचायतींपैकी २८, वेल्हे तालुक्यात ७0 पैकी २६ ग्रामपंचायती हगणदारीमुक्त होऊन आघाडी घेतली आहे. जिल्ह्यात सर्वांत मागे इंदापूर तालुका असून, तेथील ११३ पैकी फक्त २ ग्रामपंचायतींना १00 टक्के शौचालये बांधली आहेत. त्यानंतर दौंडमधील ७९ पैकी एकच ग्रामपंचायत आहे. (प्रतिनिधी)