आठ जागांसाठी २३ नगरसेवक रिंगणात
By Admin | Updated: September 29, 2014 05:41 IST2014-09-29T05:41:28+5:302014-09-29T05:41:28+5:30
आघाडीत बिघाडी आणि महायुतीत काडीमोड झाल्याने शहरात सर्वच राजकीय पक्ष स्वबळावर लढणार आहेत

आठ जागांसाठी २३ नगरसेवक रिंगणात
पुणे : आघाडीत बिघाडी आणि महायुतीत काडीमोड झाल्याने शहरात सर्वच राजकीय पक्ष स्वबळावर लढणार आहेत. त्यामुळे ऐन वेळी उमेदवारीसाठी राजकीय पक्षांची धावाधाव झाली असली, तरी या आठ जागांवर वर्णी लावण्यासाठी महापालिकेच्या तब्बल २३ नगरसेवकांची लॉटरी लागली आहे. त्यात काही बंडखोर नगरसेवकांचाही समावेश आहे. विधानसभा निवडणुकीत अशा प्रकरे एवढ्या मोठ्या प्रमाणात संधी मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
गेली २५ वर्षे असलेली शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती आणि गेल्या १५ वर्षांपासून महाराष्ट्रात सत्तेत असलेली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या विधानसभा निवडणुकीत जागावाटपाचे सूत न जुळल्याने हे चारही पक्ष एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. मात्र, या युती आणि आघाडीमुळे ज्या पक्षांकडे शहरातील आठ मतदारासंघांमध्ये जे मतदारसंघ आपल्या मित्रपक्षांकडे, त्या मतदारसंघामध्ये या चारही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी कधीच पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शहरातील आठ मतदारसंघांमध्ये सुमारे २३ नगरसेवकांचे अर्ज आहेत. त्यात प्रमुख पक्षाकडून उमेदवारी मिळालेल्या नगरसेवकांसह बंडखोरी करणाऱ्या नगरसेवकांचाही समावेश आहे. शहरात उमेदवारी देण्यात आलेल्या नगरसेवकांमध्ये सर्वाधिक प्रत्येकी ६ नगरसेवकांना राष्ट्रवादी काँग्रेसने आणि मनसेने संधी दिलेली आहे, त्या खालोखाल भारतीय जनता पक्षाने ३, शिवसेनेने २, तर काँग्रेसने एका उमेदवारास संधी दिलेली आहे. तर पाच नगरसेवक पक्षाकडून विद्यमान आमदारांविरोधात संधी न मिळाल्याने अपक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात उभे आहेत. तर तीन माजी नगरसेवकही शहरतून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. (प्रतिनिधी)