अभियांत्रिकीचे २२५ प्राध्यापक करणार सर्व कोविड हाॅस्पिटलचे ऑक्सिजन ऑडिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:11 IST2021-05-14T04:11:46+5:302021-05-14T04:11:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यासह संपूर्ण राज्यातच कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढल्याने ऑक्सिजनच्या मागणी देखील मोठी वाढ ...

अभियांत्रिकीचे २२५ प्राध्यापक करणार सर्व कोविड हाॅस्पिटलचे ऑक्सिजन ऑडिट
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्यासह संपूर्ण राज्यातच कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढल्याने ऑक्सिजनच्या मागणी देखील मोठी वाढ झाली. यामुळेच संपूर्ण राज्यातच ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आणि एक-एक टन ऑक्सिजनसाठी तारेवरची कसरत सुरू झाली. याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्व कोविड हाॅस्पिटलचे ऑक्सिजन ऑडिटचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात सर्व सरकारी हाॅस्पिटलचे ऑक्सिजन ऑडिट केले. यात दिवसाला तब्बल १७.६७ टन ऑक्सिजनची बचत झाली. आता शहर आणि जिल्ह्यातील सर्व खाजगी हाॅस्पिटलचे ऑक्सिजन ऑडिट करणार आहे. यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयांचे २२५ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली टीम तयार केल्याची माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी सांगितले.
देशमुख यांनी सांगितले की, सध्या संपूर्ण राज्यातच ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे दररोज उपलब्ध होणाऱ्या ऑक्सिजनचा काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे. पुणे जिल्ह्यात शहरी/ निमशहरी/ छावणी परिषद/ ग्रामीण क्षेत्रातील रुग्णालयातील ऑक्सिजन वापराचे ऑडिट करणेसाठी एकूण ६३९ रुग्णालयांसाठी १११ पथके नेमलेली आहेत. जिल्ह्यातील ३५० हून अधिक हॉस्पिटलचे गुगल मीटद्वारे प्रशिक्षण घेतले आहे. तसेच जिल्ह्यातील एकूण ६३९ हॉस्पिटलचे ऑडिट करण्याकामी अंदाजे २२५ अभियांत्रिकी कॉलेजमधील प्राध्यापकांचे देखील प्रशिक्षण घेतलेले आहे. संबंधितांना ऑक्सिजनचा पर्याप्त वापर कसा करावा, आयसीयुमधील ऑक्सिजन बचत कशी करावी, तसेच ऑक्सिजन टँक पासून ते पाईपलाईन व प्रत्यक्ष वार्डात ऑक्सिजन वहन करणाऱ्या उपकरणांमधील गळती दुरुस्तीबाबत जागृती केली आहे. आता या टीम प्रत्यक्ष जाऊन ऑक्सिजन ऑडिट करणार आहेत.
या ऑक्सिजन ऑडिट नंतर सर्व कोविड हाॅस्पिटल्सला तपासणी वेळी आढळलेल्या त्रुटीची पूर्तता निश्चित मुदतीत रुग्णालयाने करणे बंधनकारक आहे. संबंधित रुग्णालयाने रुग्णास आवश्यक तेवढाच ऑक्सिजन पुरवठा करणे अपेक्षित आहे. अति ऑक्सिजन पुरवठ्यामुळे गंभीर दुष्परिणाम दिसून आल्याने रुग्णांना आवश्यक तेवढा ऑक्सिजनचा पुरवठा करावा आदी सूचना दिल्या आहेत.