२२ लाखांची रोकड वाचली
By Admin | Updated: December 15, 2014 01:52 IST2014-12-15T01:52:59+5:302014-12-15T01:52:59+5:30
येथील एका बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला. चोरीसाठी वापरलेल्या वाहनासोबत चोरट्याला अटक करण्यात आली आहे

२२ लाखांची रोकड वाचली
भिगवण : येथील एका बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला. चोरीसाठी वापरलेल्या वाहनासोबत चोरट्याला अटक करण्यात आली आहे. या एटीएममध्ये सुमारे २२ लाखांची रोकड होती. येथे कोणतीही सुरक्षा नसल्याचे समोर आले आहे.
महादेव पोपट भोसले (रा. काळेवाडी, ता. दौंड) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. याबाबत भिगवण पोलिसांनी सांगितले की, रविवारी (दि. १४) पहाटे ४ च्या सुमारास पेट्रोलिंग करीत असताना एटीएम बंद दिसल्याने पोलीस कर्मचारी गोरख पवार यांना संशय आला. त्यांनी वरिष्ठ अधिकारी चंद्रशेखर यादव यांना माहिती दिली. यादव यांनी ताबडतोब घटनास्थळी येऊन पाहिले असता, दरवाजा आतून बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले. दरवाजा उघडला असता, आतमध्ये चोरटा होता.
चोराने सीसीटीव्ही कॅमेरावर कागद चिकटवून मशिनची वायर कापून मशिन फोडण्याचा प्रयत्न केला. ताब्यात घेतलेल्या जीप (एमएच ४५ / ८१७२) वर ‘भारत सरकार’ असा लोगो वापरण्यात आला होता. या वेळी पोलीस हवालदार काळे , हडागळे, भागवत यांनी या कामगिरीत भाग घेतला. (वार्ताहर)