बलात्कारप्रकरणी २० वर्षे शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 02:01 IST2019-02-28T02:01:10+5:302019-02-28T02:01:12+5:30
चौघांना सक्तमजुरी : प्रत्येकी २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला

बलात्कारप्रकरणी २० वर्षे शिक्षा
पुणे : दिव्यांग तरुणीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करणाऱ्या चार नराधम आरोपींना विशेष न्यायाधीश जी. पी. आगरवाल यांनी २० वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेपैकी १ लाख रुपये पीडितेला देण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत.
विजयपाल बिक्की सिंग (वय २२, रा. खंडाळा, ता. मावळ, जि. पुणे), दिलवर हाफीज खान (वय २४, रा. वळवण गाव, लोणावळा), यासिन शाकिर खान (वय ३५, रा. टेबल लँड, बाजार पोस्ट आॅफिस, लोणावळा), सतीश चिठीभल ऊर्फ रामासारे गुप्ता (वय ३३, रा. नेताजीवाडी, खंडाळा, ता. मावळ, जि. पुणे) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी विजयपालला न्यायालयाने ३५ हजारांचा दंड सुनावला आहे. ३० एप्रिल २०१४ ते २ मे २०१४ दरम्यान हा प्रकार घडला. अतिरिक्त सरकारी वकील सुरेश गवळी यांनी खटल्यात आठ साक्षीदार तपासले.
पीडित तरुणी मतिमंद असल्याचे माहिती असताना आरोपींनी संगनमताने लग्नाचे आमिष दाखवून तिचे पुणे स्टेशन येथून अपहरण केले. त्यानंतर ते तिला मावळ येथील मु. पो. दहिवली येथील वैभव निवास येथे घेऊन गेले. तेथे आरोपी विजयपाल, दिलवर आणि यासिन यांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी चौघे तिला खंडाळा येथील झाडीत घेऊन गेले. त्या ठिकाणी चौघांनी तिच्यावर पुन्हा सामूहिक बलात्कार केला. तिच्यावर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर लोणावळा पोलिसांनी चौघांच्या मुसक्या आवळल्या.
पीडितेची साक्ष महत्त्वाची
याप्रकरणी त्यांना अटक होऊन त्यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल झाले. पीडित तरुणी मतिमंद असल्याचे माहिती असताना देखील चारही आरोपींनी केलेल्या घृणास्पद कृत्याबद्दल अतिरिक्त सरकारी वकील सुरेश गवळी यांनी जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली. खटल्यात पीडित मुलीची साक्ष आणि डीएनए अहवाल महत्त्वाचा ठरला. त्यानुसार न्यायालयाने चौघांनाही विविध कलमान्वये २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.