नऊ महिन्यांत २० हजार तक्रारी
By Admin | Updated: January 16, 2016 02:42 IST2016-01-16T02:42:53+5:302016-01-16T02:42:53+5:30
मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या ‘१८२’ क्रमांकाच्या हेल्पलाइनला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागात या क्रमांकावर दिवसाला विविध प्रकारच्या

नऊ महिन्यांत २० हजार तक्रारी
पिंपरी : मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या ‘१८२’ क्रमांकाच्या हेल्पलाइनला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागात या क्रमांकावर दिवसाला विविध प्रकारच्या ७० ते ८० तक्रारी येत आहेत. मागील नऊ महिन्यांत सुमारे २० हजार तक्रारी क्रमांकावर आल्या आहेत.
पूर्वी रेल्वेकडून तक्रारींसाठी आठ आकडी दूरध्वनी क्रमांक व मोबाइल क्रमांक देण्यात आला होता. या क्रमांकावर आलेला कॉल प्रवासी ज्या स्थानकाजवळ असेल, तेथील जवळपासच्या रेल्वे स्थानकावरील रेल्वे पोलीस फोर्सच्या (आरपीएफ) ठाण्याकडे वर्ग केला जायचा. तेथून मग प्रवाशांना मदत दिली जात असे. यामुळे मदत मिळण्यासाठी विलंब होत असे. या वेळखाऊ प्रक्रियेमुळे प्रातिनिधिक स्वरूपात १३ आॅक्टोबर २०१४ ला ‘१३२२’ हा हेल्पलाइन क्रमांक सुरू केला. याला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे मध्य रेल्वेने देशात एकच हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्याचे ठरविले. या अनुषंगाने एप्रिल २०१५ ला ‘१८२’ या क्रमांकाची हेल्पलाइन सुरू करण्यात आली.
महिलांची छेडछाड रोखण्यासाठी, महिलांच्या आरक्षित डब्यामध्ये पुरुषांचा प्रवेश टाळणे या मुख्य उद्देशासाठी ही हेल्पलाइन सुरू करण्यात आली. मात्र, नागरिकांपर्यंत याचा हेतू पोहोचू न शकल्याने तिकिटासंदर्भात विचारपूस, रेल्वेच्या वेळेबाबत चौकशीचे कॉलही येतात. मागील महिन्यापासून प्रत्येक रेल्वे स्थानकावर या हेल्पलाइन क्रमांकाबाबत जनजागृती करण्याचे काम सुरू केले. पत्रके वाटण्यात आली. स्टिकर लावण्यात आले.
तिकीट हरवले असल्यास, जनरल डब्याचे तिकीट असताना आरक्षित जागेवर बसल्यास, मद्यपींकडून प्रवाशांना त्रास होत असल्यास, अपंगांच्या व महिलांच्या डब्यात प्रवेश केल्यास या हेल्पलाइन क्रमांकावर तक्रार येतात. सर्वच कंपन्यांची मोबाइल सेवा असेल, तरीही या क्रमांकावर फोन करता येईल. एप्रिल ते डिसेंबर २०१५ दरम्यान १८२ हेल्पलाइन क्रमांकावर पुणे विभागात २० हजार कॉल
आले आहेत. यामध्ये बारामती,
दौंड, सोलापूर, लोणावळा या मार्गांचाही समावेश आहे. दिवसाला येणाऱ्या ७० ते ८० कॉलपैकी १५ टक्के कॉल तक्रारींचे असतात. यामध्ये केवळ दोन टक्के कॉल महिलांच्या तक्रारीचे आहेत. एखादी आजारी व्यक्ती रेल्वेतून प्रवास करीत असेल. त्यांचा मोबाइल बंद असेल, तर त्यांच्या नातेवाइकांकडून आलेले कॉलसुद्धा प्रवाशांपर्यंत पोहोचविण्याचे काम हेल्पलाइनच्या माध्यमातून केले जाते. (प्रतिनिधी)
या हेल्पलाइन क्रमांकाला चांगला प्रतिसाद आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा क्रमांक पोहोचावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जनजागृती सुरू आहे. सर्व रेल्वे स्थानकांवर पत्रके वाटली जात आहेत. स्थानकावर आणि रेल्वेच्या डब्यांमध्ये स्टिकर्स लावण्यात आले आहेत. लोकांपर्यंत रेल्वेच्या जास्तीत जास्त सुविधा देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. रेल्वेतील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नवनवीन उपाययोजना केल्या जातात.
- डी. विकास, विभागीय सुरक्षा उपायुक्त, रेल्वे सुरक्षा दल