आॅनलाइनद्वारे भरले १९ कोटी वीजबिल
By Admin | Updated: March 11, 2017 03:05 IST2017-03-11T03:05:54+5:302017-03-11T03:05:54+5:30
महावितरणच्या बारामती परिमंडलातील जवळपास दीड लाख ग्राहकांनी मागील महिन्यात वीजबिलापोटी १९ कोटी रुपयांहून अधिक रकमेचा आॅनलाइन भरणा केला आहे.

आॅनलाइनद्वारे भरले १९ कोटी वीजबिल
बारामती : महावितरणच्या बारामती परिमंडलातील जवळपास दीड लाख ग्राहकांनी मागील महिन्यात वीजबिलापोटी १९ कोटी रुपयांहून अधिक रकमेचा आॅनलाइन भरणा केला आहे. महावितरणने संकेतस्थळासोबतच मोबाईल अॅपची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे आॅनलाईन वीजबिल भरण्याकडे ग्राहकांचा कल आहे.
महावितरणने वेबसाईटवर आॅनलाईन बिल पेमेंट सुविधेसह महावितरण मोबाईल अॅप उपलब्ध करून दिले आहे. सर्व लघुदाब ग्राहकांना चालू व मागील बिले पाहणे आणि भरण्यासाठी नेटबँकिंग, क्रेडिट, डेबिट कार्डांसह मोबाईल वॉलेट व कॅश कार्डचा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे रांगेत उभे राहण्याऐवजी महावितरणच्या वेबसाईट व मोबाईल अॅपवरून वीजबिल भरण्यास ग्राहकांची पसंती वाढलेली आहे.
फेब्रुवारी महिन्यात बारामती परिमंडलात १ लाख ४६ हजार ९१४ वीजग्राहकांनी १९ कोटी ३८ लाख रुपयांच्या वीजबिलांचे आॅनलाईन पेमेंट केले आहे. यात बारामती मंडलांतर्गत बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, पुरंदर व भोर या तालुक्यांतील २६ हजार ३५८ ग्राहकांनी ५ कोटी ३० लाख, सोलापूर मंडलातील ३८ हजार ६४५ ग्राहकांनी ६ कोटी १६ लाख, तर सातारा मंडलातील ८१ हजार ९११ ग्राहकांनी ७ कोटी ९२ लाख रुपयांचे वीजबिल आॅनलाईन भरले आहे. या माध्यमातून ग्राहकांना वीजबिल आॅनलाईन भरण्याचे महत्त्व पटत असल्याचे दिसते. आता इंटरनेट व मोबाईलच्या माध्यमातून वीजबिल भरण्याकडे ग्राहकांचा कल आहे.
महावितरणने लघुदाब ग्राहकांना वीजबिल आॅनलाईन भरण्यासह ई-मेलद्वारे वीजबिल मिळविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच, छापील कागदाऐवजी ‘गो-ग्रीन’ संकल्पनेअंतर्गत वीजबिलाच्या फक्त ई-मेलचा पर्याय स्वीकारल्यास दरमहा ३ रुपये सूट दिली जात आहे. तथापि, छापील कागदासह ई-मेलद्वारेही वीजबिल मिळविण्याची सोय उपलब्ध आहे. याबाबतची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे. याशिवाय, मुदत संपल्यानंतरही विलंब शुल्काच्या रकमेसह वीजबिल आॅनलाईन भरण्याची सोय उपलब्ध आहे. महावितरणच्या आॅनलाईन बिल भरण्याच्या सुविधेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले.