घोड धरणात १८ ते २० टक्केगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2016 01:15 IST2016-02-03T01:15:41+5:302016-02-03T01:15:41+5:30

चिंचणी (ता. शिरूर) येथील घोड धरणामध्ये आजअखेर १४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. चार वर्षांपूर्वी महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिर्सच इन्स्टिट्यूट (मेरी) या संस्थेतर्फे

18 to 20 percent of the horse dam | घोड धरणात १८ ते २० टक्केगाळ

घोड धरणात १८ ते २० टक्केगाळ

निमोणे : चिंचणी (ता. शिरूर) येथील घोड धरणामध्ये आजअखेर १४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. चार वर्षांपूर्वी महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिर्सच इन्स्टिट्यूट (मेरी) या संस्थेतर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात १८ ते २० टक्के गाळ साचला असल्याचा अहवाल संस्थेने दिला होता, अशी माहिती शाखा अभियंता एन. एस. साळवे यांनी दिली.
चिंचणी (ता. शिरूर) येथील घोड धरणाची पाणी साठवण क्षमता ५.४७ टीएमसी आहे. त्यापैकी २ हजार १७२ द. ल. घ. फू. हा मृत, तर ३ हजार ४६७ द. ल. घ. फू. हा उपयुक्त पाणीसाठा मानला जातो. धरणाच्या उभारणीपासून आतापर्यंत संबंधित खात्याच्या वतीने धरणात साठलेला गाळ काढण्याची खास अशी व्यवस्था न झाल्याने धरणपात्रात सध्या मोठ्या प्रमाणावर गाळ आहे. त्यामुळे धरणाच्या साठवण क्षमतेवर परिणाम झाला आहे.
चार वर्षांपूर्वी महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिर्सच इन्स्टिट्यूट (मेरी) या संस्थेने या धरणातील गाळाचे सर्वेक्षण केले होते. त्यांच्या अहवालात जवळपास १८ ते २० टक्के गाळ धरणात साचला असल्याचा अंदाज त्यांनी दिला होता. यामुळे धरणाच्या पाणीक्षमतेवर परिणाम झाला आहे.
अलीकडच्या काळात पावसाचे कमी झालेले प्रमाण व या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात नव्याने झालेल्या पाच धरणांमुळे बरेच पाणी वर अडविले जाते. त्यामुळे २००० सालानंतर हे धरण अभावानेच १०० टक्के भरले आहे.
या धरणाच्या लाभक्षेत्रामध्ये शिरूर, कर्जत व श्रीगोंदा तालुक्यातील सुमारे साडेसहा हजार हेक्टर शेती सिंचनाखाली आहे. मात्र, पाण्याच्या कमतरतेमुळे हे क्षेत्र घटत चालले आहे. याशिवाय धरणाच्या पाण्यावर घोडगंगा सहकारी साखर कारखाना; तसेच रांजणगाव-कारेगाव औद्योगिक वसाहतीतील कारखाने या पाण्यावर चालतात. हे पाणी वाहून नेणारी जलवाहिनी जीर्ण झाल्याने ठिकठिकाणी गळतीमुळे दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होतो.

Web Title: 18 to 20 percent of the horse dam