घरफोडी करून १७ तोळे सोने लंपास लोणी
By Admin | Updated: June 2, 2014 00:38 IST2014-06-02T00:38:42+5:302014-06-02T00:38:42+5:30
उकडते म्हणून घराला कुलूप लावून टेरेसवर झोपल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून घरातील सतरा तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना पुणे-सोलापूर महामार्गावरील कवडी पाट येथे घडली

घरफोडी करून १७ तोळे सोने लंपास लोणी
काळभोर : उन्हाळ्याच्या दिवसांत उकडते म्हणून घराला कुलूप लावून टेरेसवर झोपल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून घरातील सतरा तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना पुणे-सोलापूर महामार्गावरील कवडी पाट येथे घडली. पोलीस निरीक्षक अभिमान पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी पहाटे पाच वाजता उघडकीस आली. या प्रकरणी हरिश्चंद्र उद्धव झेंडे यांनी फिर्याद दिली आहे. ३० मे रोजी रात्री जेवण झाल्यानंतर घरात उकडत असल्याने हरिश्चंद्र झेंडे हे आपल्या कुटुुंबीयांसमवेत घराला कुलूप लावून टेरेसवर झोपण्यासाठी गेले. ३१ मे रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांचा मुलगा शुभम उठला. तो घराजवळ आल्यावर त्याला दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. त्याने तातडीने सर्वांना उठवले. ते घरात गेले असता बेडरूममध्ये असलेले लाकडी कपाट त्यांना उघडे दिसले. तसेच, कपाटातील सामान, कपडे अस्ताव्यस्त पडलेले दिसले. चोरट्यांनी कपाटातील ड्रॉव्हरमध्ये ठेवलेला नऊ तोळे वजनाचा राणीहार, सात तोळे वजनाचे गंठण व एक तोळा वजनाची कर्णफुले आणि झुबे असे एकूण सतरा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले. त्यांच्या शेजारी राहणारे भाडेकरू किरण काशिनाथ मनोहर व संतोष लंबाते यांच्या घराचे कुलूपही तुटलेले आढळून आले. हे दोघेही बाहेरगावी गेले असल्याने त्यांच्या घरातून काय चोरीस गेले, हे समजू शकले नाही. पुढील तपास पोलीस सबइन्स्पेक्टर विजया म्हेत्रे करत आहेत. (प्रतिनिधी)