पुणे: महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयाने आरोग्यसेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय टप्पा गाठत अवघ्या नऊ तासांत प्रसूती व स्त्रीरोग विभागातील तब्बल १७ शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केल्या. शुक्रवारी (दि.१३) सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत या सर्व शस्त्रक्रिया पार पडल्या. रुग्णालयाच्या इतिहासातील ही सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली आहे.
यात १२ सिझेरियन शस्त्रक्रिया (एलएससीएस), एक व्हजायनल हिस्टरेक्टॉमी, दोन एमटीपी विथ क्यूट आणि दोन एमटीपी विथ लॅप ट्यूबल लिगेशन या शस्त्रक्रियांचा समावेश होता. दोन रुग्णांना गर्भधारणेदरम्यान उच्चरक्तदाब, एका रुग्णास गरोदरपणातील मधुमेह तर इतर बहुतांश रुग्ण उच्च-जोखमीच्या व पूर्वी सिझेरियन झालेल्या गर्भवती महिलांच्या होत्या. वैद्यकीय गुंतागुंतीच्या परिस्थितीतही सर्व शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले. या यशामागे प्रसूती व स्त्रीरोग विभागातील तज्ज्ञ डॉ. महादेव, डॉ. शिल्पा, डॉ. अंजली, डॉ. अरविंद, डॉ. श्रेया, डॉ. रचना एन आणि भूलतज्ज्ञ विभागाच्या डॉ. अश्विनी आणि डॉ. शीतल, बालरोग विभाग तसेच शस्त्रक्रिया विभागातील परिचारिका व सहायक कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे ठरले.
महापालिका प्रशासनाने कमला नेहरू रुग्णालयातील वैद्यकीय सेवा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने करार पद्धतीने तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मुलाखतीअंती फिजिशियन संवर्गातील २, बधिरीकरणतज्ज्ञ २, स्त्रीरोगतज्ज्ञ ७ आणि बालरोगतज्ज्ञ ६ असे एकूण १७ उमेदवार पात्र ठरले. त्यापैकी फिजिशियन १, बधिरीकरणतज्ज्ञ २, स्त्रीरोगतज्ज्ञ ६ व बालरोगतज्ज्ञ ४ असे एकूण १३ तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी कमला नेहरू रुग्णालयात प्रत्यक्ष रुजू झाले आहेत. त्यामुळे रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा सक्षम झाली आहे. उर्वरित पात्र उमेदवारांच्या नियुक्तीबाबत कार्यवाही सुरू आहे.
मानधन तत्त्वावरील एकूण १३ तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी प्रत्यक्ष सेवेत रुजू झाले आहेत. पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध झाल्यामुळे नियोजनबद्ध पद्धतीने काम पार पडले. विशेष म्हणजे, त्याच दिवशी रुग्णालयातील इतर विभागातील वेगवेगळ्या १५ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. एकाच दिवसात एकूण ३२ शस्त्रक्रियांची नोंद झाली असून, सर्वसामान्य रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. - डॉ. प्रशांत बोठे, वैद्यकीय अधीक्षक, कमला नेहरू रुग्णालय.
Web Summary : Pune's Kamala Nehru Hospital performed 17 obstetrics and gynecology surgeries in just 9 hours, a record feat. This included 12 C-sections. The hospital credits newly appointed specialist doctors and staff for the achievement, significantly boosting patient care.
Web Summary : पुणे के कमला नेहरू अस्पताल ने सिर्फ 9 घंटों में 17 प्रसूति और स्त्री रोग सर्जरी करके एक रिकॉर्ड बनाया। इसमें 12 सी-सेक्शन शामिल थे। अस्पताल ने इस उपलब्धि का श्रेय नव नियुक्त विशेषज्ञ डॉक्टरों और कर्मचारियों को दिया है, जिससे रोगी देखभाल में काफी सुधार हुआ है।