१५६० मुलांना प्रवेशच नाही!
By Admin | Updated: October 12, 2015 01:27 IST2015-10-12T01:27:36+5:302015-10-12T01:27:36+5:30
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहात प्रवेश देताना स्थानिकांना प्राधान्य द्यावे, असा ठराव जिल्हा परिषदेने करूनही घोडेगाव प्रकल्पांतर्गत सुमारे १५६० आदिवासी मुलांना प्रवेशच मिळाला नाही

१५६० मुलांना प्रवेशच नाही!
घोडेगाव : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहात प्रवेश देताना स्थानिकांना प्राधान्य द्यावे, असा ठराव जिल्हा परिषदेने करूनही घोडेगाव प्रकल्पांतर्गत सुमारे १५६० आदिवासी मुलांना प्रवेशच मिळाला नाही. मर्यादित जागा व बाहरून येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढत असल्याने ही मुले वंचित राहिली आहेत.
अनुसूचित जमातींसाठी असलेल्या घोडेगाव प्रकल्प कार्यालयांतर्गत २४ वसतिगृहे आहेत. यामध्ये ३८१० एवढी प्रवेशक्षमता असून, यावर्षी ५३७४ विद्यार्थ्यांनी प्रवेश मागितला.
पुणे शहरात कोरेगाव पार्क, हडपसर, मांजरी फार्म, पिंपरी चिंचवड, सोमवारपेठ, सांगवी येथे वसतिगृह आहेत. येथील वसतिगहात १८२५ विद्यार्थ्यांना प्रवेश देता येऊ शकतो. यावर्षी २७७६ विद्यार्थ्यांनी प्रवेश मागितला होता.
सोलापूर जिल्ह्यातील
वसतिगृह भरत नाहीत म्हणून येथील २०० जागा पुण्यातील वसतिगृहांमध्ये वाढवून घेतल्या. तरीही
सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश देता येत नाही. पुणे ग्रामीणमध्ये घोडेगाव, मंचर, शिनोली, जुन्नर, ओतूर, राजगुरुनगर, वडगाव मावळ, डेहणे येथील वसतिगृहांमध्ये १७७० क्षमता आहे. येथे २४३७ विद्यार्थ्यांनी प्रवेश मागितला होता.
प्रवेश देताना जुन्या विद्यार्थ्यांना प्रथम प्रवेश द्यावा लागतो. नंतर नवीन विद्यार्थी घेतले जातात. मात्र, यात स्थानिक मुलांना प्रवेश मिळत नाही. बाहेरील जिल्ह्यातील मुले प्रवेश मिळवतात.
कारण स्थानिक विद्यार्थ्यांना बीए, बीकॉम, डी.एड., बी.एड. करण्याची व्यवस्था ग्रामीण भागात आहे. त्यामुळे हे शिक्षण घेणारे विद्यार्थी शहरात प्रवेश मागत नाहीत. व्यावसायिक व तांत्रिक शिक्षण घेणारेच विद्यार्थी प्रवेश मागतात. मात्र बाहेर जिल्ह्यातील सर्व प्रकारे विद्यार्थी पुण्यात प्रवेश मागतात. यात मेरिटनुसार प्रवेश देण्यात येत असल्याने स्थानिक विद्यार्थी वंचित राहतात. ५० टक्के बाहेरच्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळवला आहे.
राज्यात सगळीकडे शिक्षणाची व्यवस्था झाली आहे. परंतु बीए, बीकॉम यांसारखे शिक्षण घेण्यासाठीसुद्धा विद्यार्थ्यांना पुण्यातच यायचे आहे.़
याबाबत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी चेतना मोरे यांनी सांगितले, मंजूर संख्येपेक्षा
जास्त जागा घेण्यास शासनाने नकार दिला आहे. मेरिटलिस्टनुसार आलेल्या सर्व मुलींना प्रवेश दिले आहेत.
तरीही आम्ही अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ
शकलेलो नाही. कारण पुण्यामध्ये महाराष्ट्रातील सर्व मुले शिकायला येऊ लागली आहेत. राज्यातील इतर प्रकल्पांच्या जागा रिकाम्या राहात आहेत. फक्त घोडेगाव प्रकल्पात विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. (वार्ताहर)