२३ गावांच्या आराखड्यावर हरकतींसाठी १५ दिवसांची मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:24 IST2021-09-02T04:24:46+5:302021-09-02T04:24:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतून पुणे महापालिकेत समावेश झालेल्या २३ गावांचा विकास ...

२३ गावांच्या आराखड्यावर हरकतींसाठी १५ दिवसांची मुदतवाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतून पुणे महापालिकेत समावेश झालेल्या २३ गावांचा विकास आराखडा हा पीएमआरडीएने २ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केला आहे. त्याला ३० दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र, आता त्यात आणखी १५ दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती आयुक्त सुहास दिवसे यांनी दिली.
प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध केल्यानंतर १ सप्टेंबर २०२१ पर्यंत मुदत देण्यात आली होती. आज त्याची मुदत संपली आहे. त्यामुळे आणखी १५ दिवस मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, आता १६ सप्टेंबरपर्यंत हरकती, सूचना नोंदवता येणार आहेत.
पीएमआरडीएच्या औंध आणि आकुर्डी कार्यालयासह नसरापूर, वाघोली, वडगाव मावळ तसेच कार्यक्षेत्रातील ९ तहसील कार्यालयांतही हरकती प्रत्यक्ष नोंदवता येणार आहे. तसेच ज्या नागरिकांना हरकती, सूचना प्रत्यक्ष कार्यालयात येऊन देता येणे शक्य नाही, अशा नागरिकांनी pmr.dp.planning@gmail.com हा मेल आयडीवर हरकती पाठवता येणार आहेत.
---
...या विभागीय केंद्रावर नोंदवता येणार हरकती
* औंध येथील पीएमआरडीएचे मुख्य कार्यालय
* आकुर्डी येथील पीएमआरडीए कार्यालय
* वाघोली क्षेत्रीय कार्यालय (ग्रामपंचायत कार्यालयामागे)
* नसरापूर क्षेत्रीय कार्यालय (तलाठी कार्यालयाशेजारी)
* वडगाव मावळ क्षेत्रीय कार्यालय (जुनी पंचायत समिती इमारत)
* पीएमआरडीए कार्यक्षेत्रातील नऊ तहसील कार्यालय