बेवारस मृतावर १५ दिवसांनी अंत्यसंस्कार

By Admin | Updated: July 1, 2015 23:42 IST2015-07-01T23:42:18+5:302015-07-01T23:42:18+5:30

प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी दौंड नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना सूचना केल्यानंतर तब्बल १५ दिवसांनी बेवारस मृतावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

15 days after cremation | बेवारस मृतावर १५ दिवसांनी अंत्यसंस्कार

बेवारस मृतावर १५ दिवसांनी अंत्यसंस्कार

मनोहर बोडखे, दौंड
प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी दौंड नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना सूचना केल्यानंतर तब्बल १५ दिवसांनी बेवारस मृतावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अन्यथा, बेवारस मृताच्या अंत्यसंस्कारांसाठी नेहमीच टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप रेल्वे पोलिसांनी केला आहे़ त्यामुळे रेल्वे स्थानक परिसरातील बेवारस मृतदेहांच्या अंत्यसंस्कारांचा प्रश्न ऐरणीवर आहे.
बेवारस मृतदेह सापडल्यानंतर त्याच्यावर शवविच्छेदन करून तीन दिवस तो पोलिसांच्या ताब्यात
असतो. कोणी नातेवाईक आढळून न आल्यास मृतदेहाच्या अंत्यसंस्कारांची जबाबदारी शहरी भागात नगर
परिषद, तर ग्रामीण भागात ग्रामपंचायतीची असल्याचा कायदा आहे, असे सहायक पोलीस निरीक्षक वसंतराव शेटे यांनी सांगितले. दरम्यान, बेवारस मृतदेहाची विल्हेवाट लावण्याकरिता टाळाटाळ केली जाते, अशी तक्रार तहसीलदार उत्तम दिघे यांच्याकडे केली होती. ही तक्रार करण्यापूर्वी बेवारस मृतदेहांची विल्हेवाट लावावी म्हणून नगर परिषदेकडे वेळोवेळी पाठपुरावा केला.
मात्र, नगर परिषदेने जागेची अडचण सांगून त्या संदर्भात चालढकलीचे धोरण अवलंबले. परिणामी, बेवारस मृतदेह पुण्याला ससून रुग्णालयात पाठवा, असाही सल्ला नगर परिषदेने पोलिसांना दिला असल्याचे शेटे म्हणाले.
याबाबत रेल्वे पोलिसांना कळविले असून, बेवारस मृतदेह
ससून येथे पाठविण्यात यावा,
अशाही सूचना करण्यात आली असल्याचे मुख्याधिकारी शिवाजी कापरे यांनी तहसीलदारांना लेखी उत्तर दिले आहे.

१५ दिवसांपासून मृतदेह रुग्णालयात
१५ दिवसापूर्वी रेल्वे स्थानक परिसरात बेवारस मृतदेह आढळला. हा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. या ठिकाणी शवविच्छेदन झाल्यानंतर अंत्यसंस्कारांसाठी मृतदेह घेऊन जा, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांना सांगितले. परंतु, नगर परिषद मृतदेह नेण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याने १५ दिवस तो ग्रामीण रुग्णालयाच्या शवागारात पडून होता. त्यामुळे परिसरात उग्र वास सुटल्याने या भागातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले होते.

दफनासाठी जागा नाही
बेवारस मृतदेहांचे दफन करण्यासाठी नगर परिषदेकडे सध्या मोकळी जागा उपलब्ध नाही. पूर्वी ज्या ठिकाणी बेवारस मृताला दफन करण्यात येत होते, त्या परिसरातील नागरिकांचा विरोध होऊ लागल्याने आता तेथे दफन करता येत नाही़ कारण, मध्यंतरी पोलिसांनी एका मृतदेहाचे दफन केले होते. त्याचा खड्डा वरच्यावर खोदला गेला. पोलीस गेल्यानंतर कुत्र्यांनी खड्डा उकरला आणि प्रेताचे अवयव परिसरात अस्ताव्यस्त पसरविले. यामुळे रहिवाशांनी या परिसरात दफन करण्यासाठी विरोध केला आहे.

अगोदर पहिले मृतदेह न्या, नंतरच शवविच्छेदन
दोन दिवसांपूर्वी रेल्वे स्थानक परिसरात पुन्हा एक बेवारस मृतदेह सापडला. तेव्हा तो शवविच्छेदनासाठी उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात नेला असता तेथील अधिकारी म्हणाले, की १५ दिवसांपासून शवविच्छेदन गृहातील मृतदेह अंत्यसंस्कारांसाठी घेऊन जा, नंतरच आलेल्या नवीन मृतदेहाचे शवविच्छेदन केले जाईल, असे सांगितल्यानंतर आम्ही तहसीलदार उत्तम दिघे यांच्याकडे नगर परिषदेच्या तक्रारीसाठी गेलो. या वेळी प्रांताधिकारी समीर शिंगटे उपस्थित होते. त्यांना बेवारसांच्या अंत्यसंस्कारांविषयी टाळाटाळ होत असल्याची कल्पना दिल्यानंतर त्यांनी तातडीने मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधून संबधित मृतदेहावर तातडीने अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना दिल्यानंतर मंगळवारी (दि. ३0)
सायंकाळी उशिरा पोलिसांच्या उपस्थितीत नगर परिषदेच्या वतीने मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: 15 days after cremation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.