प्रवेशाच्या आमिषाने १४ लाखांचा गंडा

By Admin | Updated: October 29, 2016 04:17 IST2016-10-29T04:17:45+5:302016-10-29T04:17:45+5:30

मुलीला खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून विद्यार्थिनीच्या पालकाला १४ लाख ७० हजार रुपयांना गंडा घातल्याचा

14 lakhs of money bidders | प्रवेशाच्या आमिषाने १४ लाखांचा गंडा

प्रवेशाच्या आमिषाने १४ लाखांचा गंडा

वडगाव निंबाळकर : मुलीला खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून विद्यार्थिनीच्या पालकाला १४ लाख ७० हजार रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी पाच जणांविरोधात वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. इतर चार आरोपी अद्याप फरार आहेत, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी दिली.
डॉ. बाळासाहेब साहेबराव सोनवणे (रा. वडगाव निंबाळकर) यांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वैभव विजय कांबळे (महाराज) (रा. दौंड, जि. पुणे) शिक्षक विवेक वसंत देशपांडे व सीमा बिपीन पवार (दोघेही रा. सेंट पॅट्रिक हायस्कूल भैरोबानाला हडपसर, पुणे), पवन व्ही. जोशी (जोशी बंगला, दौंड), सुषमा नागवेकर (रा. कवडे रोड, अमेय कॉम्प्लेक्स, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. यापैकी आरोपी विवेक देशपांडे याला अटक करण्यात आली आहे.
सन २०१३ मध्ये डॉ. सोनवणे यांची मुलगी प्रीती ही बारावी विज्ञान शाखेत ७८ टक्के गुणांसह उत्तीर्ण झाली होती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तिला प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे तिचे पालक खासगी वैद्यकीय महाविद्यालयात कमी खर्चात प्रवेश मिळावा, यासाठी प्रयत्न करीत होते. दौंड येथील ज्योतिषतज्ज्ञ वैभव कांबळेमहाराज यांनी प्रीती हिचा गुरु व चंद्र बलवंत आहे. तिला एमबीबीएसला प्रवेश मिळवून देतो, असे सांगत पालकांकडे १० लाख रुपयांची मागणी केली. कांबळे यांनी या वेळी देशपांडे व पवार यांची ओळख करून देत ते शिक्षक असल्याचे सांगितले. पालकांचा विश्वास संपादन केला. डोनेशनचे दहा लाख व पाच लाख रुपये प्रवेश शुल्क अशी १५ लाखांची रक्कम द्यावी लागेल, असे आरोपींनी सांगितले. त्या वेळी डॉ. सोनवणे यांनी त्यांना साडेसात लाख रुपये दिले. जोशी यांच्या खात्यावर दीड लाख रुपये भरले. उरलेली रक्कमही पवार व अन्य लोकांच्या खात्यावर भरली. जुलै २०१३ ते मार्च २०१४ यादरम्यान आरोपींनी डॉ. सोनवणे यांच्याकडून वेळोवेळी आरोपींकडून १५ लाख २५ हजारांची मागणी करण्यात आली होती.
(वार्ताहर)

पैशासाठी हुलकावण्या व पालकांच्या धमक्याही...
आरोपींना सोनवणे यांच्याकडून १४ लाख ७० हजार रुपये वेळोवेळी देण्यात आले होते. आरोपींनी त्यांना त्याबदल्यात बँकेचे धनादेशही दिले. परंतु प्रवेशप्रक्रिया संपल्यानंतरही प्रवेशाचे काम झाले नाही. सोनवणे यांनी आरोपींकडे पैशाची मागणी केली असता आरोपींनी वेळोवेळी मुदत मागून घेत त्यांना हुलकावण्या दिल्या. पाठपुरावा केला असता मारहाण करून पैसे मागितले तर जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: 14 lakhs of money bidders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.