सोळा कोटींचे १२५ विषय
By Admin | Updated: February 10, 2016 03:28 IST2016-02-10T03:28:01+5:302016-02-10T03:28:01+5:30
महापालिकेतील स्थायी समितीतील काही सदस्यांची मुदत लवकरच संपणार आहे. तसेच आर्थिक वर्षही संपत आल्याने स्थायी समितीने विषय मंजुरीचा धडाका लावला आहे. निधीची पळवापळवी

सोळा कोटींचे १२५ विषय
पिंपरी : महापालिकेतील स्थायी समितीतील काही सदस्यांची मुदत लवकरच संपणार आहे. तसेच आर्थिक वर्षही संपत आल्याने स्थायी समितीने विषय मंजुरीचा धडाका लावला आहे. निधीची पळवापळवी सुरू झाली आहे. गुरुवारी होणाऱ्या सभेपुढे स्थापत्य, उद्यान, जलनिस्सारण, साहित्य खरेदी, पाणीपुरवठा असे सुमारे १६ कोटींचे सुमारे सव्वाशे विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत.
महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०१७ला होणार असून, प्रभागांमध्ये अधिक प्रमाणावर विकासकामे व्हावीत, यासाठी नगरसदस्यांनी विषयांचा धडाका लावला आहे. विविध विकासकामांसाठी निधी आपल्या वॉर्डात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे दर आठवड्याला होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीसमोर येणाऱ्या विषयांची संख्या वाढू लागली आहे. त्यात स्थापत्य, पाणीपुरवठा, विद्युत, जलनिस्सारण, उद्यान, आरोग्य विभागातील विषयांची संख्या
अधिक आहे. (प्रतिनिधी)
निधीची पळवापळवी
गुरुवारी होणाऱ्या स्थायी सभेपुढे एकूण ११३ आणि आयत्या वेळेसचे धरून सुमारे सव्वाशे विषय मांडण्यात येणार आहेत. त्यात नगरसेवकांबरोबरच महापालिकेतील पदाधिकारी, स्थायीतील सदस्यांनीही आपापल्या भागातील विकासकामांसाठी वेगवेगळे विषय सुचविलेले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर निधीची पळवापळवी सुरू आहे. त्यामुळे विरोधी पक्षातील नगरसेवक सत्ताधाऱ्यांवर नाराज आहेत. आमचे विषय सत्ताधारी मंजूर करीत नाहीत, असा आरोप विरोधी पक्षांच्या नगरसेवकांकडून होत आहे.
कोटींची उड्डाणे
सर्वाधिक कामे स्थापत्य विभागाने काढली आहेत. रस्ते दुरुस्ती, सीमाभिंत बांधणे, इमारतींची दुरुस्ती अशा स्थापत्यविषयक ५ कोटी ४० लाखांचा विषय सभेपुढे ठेवला आहे. तसेच विविध भागांत एलईडी पथदिवे लावणे अशा विविध विद्युतविषयक कामांसाठी ७ कोटी ३५ लाख, शहरातील सहाही प्रभागांतील विविध भागांतील पाणीपुरवठ्याच्या वाहिन्या बदलणे, नवीन वाहिन्या टाकणे, तसेच दुरुस्ती करणे असे एकूण अडीच कोटी, तसेच जलनिस्सारणासाठी १ कोटी ४५ लाखांचा विषय मंजुरीसाठी असून, त्याचबरोबर उद्याने दुरुस्तीसाठी ३३ लाख असे एकूण सोळा कोटींचे विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत.
साहित्य खरेदीचे विषय
महापालिकेच्या विविध विभागांतील २४ लाख ९९ हजारांच्या साहित्य खरेदीच्या विषयाबरोबरच कला, क्रीडा विकास प्रकल्पातील विविध क्रीडा आणि कला स्पर्धांच्या सुमारे आठ लाखांचा निधी देणे, तसेच पिंपरी-चिंचवड महापालिका नागरिक सार्वजनिक ट्रस्ट पिंपरी यांच्या वतीने महापालिका कार्यक्षेत्रातील विविध आजारांच्या रुग्णांना आर्थिक मदत केली जाते. त्यासाठी संबंधित ट्रस्टला २५ लाख अनुदान देण्याचा विषयही सभेपुढे आहे. तसेच चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाचे नूतनीकरण, क आणि ब प्रभागातील घनकचरा उचलण्यासाठीचा १ कोटी ५ लाख, अधिकारी दौरा, आरोग्य विभाग अक्वाटेन, तसेच बीआरटी कॉरेडॉरमधील रस्त्याच्या जागेचा परतावा म्हणून सुमारे साडेतीन कोटी एमआयडीसीस देणे असे विविध विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत.