‘स्मार्ट’ विकासासाठी १२३१ कोटी

By Admin | Updated: February 17, 2016 00:58 IST2016-02-17T00:58:59+5:302016-02-17T00:58:59+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा आगामी २०१६-१७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आयुक्त राजीव जाधव यांनी मंगळवारी स्थायी समितीला सादर केला

1231 crore for 'smart' development | ‘स्मार्ट’ विकासासाठी १२३१ कोटी

‘स्मार्ट’ विकासासाठी १२३१ कोटी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचा आगामी २०१६-१७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आयुक्त राजीव जाधव यांनी मंगळवारी स्थायी समितीला सादर केला. यामध्ये निव्वळ विकासकामांसाठी १ हजार २३१ कोटींची भरीव तरतूद पहिल्यांदाच करण्यात आली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा विकासकामांसाठी ३४८ कोटींची अधिकची तरतूद करण्यात आली आहे. यातून शहराला ‘स्मार्ट’ करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. भांडवली खर्चावर जोर देण्यात आला आहे.
सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात शिलकेसह २ हजार ३१५कोटी ६८ लाख इतकी रक्कम जमा होईल, हे अपेक्षित धरून मूळ अंदाजपत्रक सादर करण्यात आले होते. तथापि, २०१५-१६ या आर्थिक वर्षाचे सुधारित अंदाजपत्रक २ हजार ४७८ कोटी जमेचे असून, यापैकी २ हजार २४८ कोटी जमा होणे अपेक्षित आहे.
सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात ८८३ कोटींची भांडवली खर्चासाठी तरतूद करण्यात आली होती. तर यंदा १ हजार २३१ कोटी करण्यात आली आहे. स्थापत्यविषयक कामासाठी सर्वाधिक ८२६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. भूसंपादनासाठी १०० कोटी, विद्युतसाठी ४६ कोटी, पाणीपुरवठा विभागासाठी ४८ कोटी, पर्यावरणासाठी ३७ कोटी, तर जलनिस्सारणासाठी यंदा तब्बल ९८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
यामध्ये यंदा स्थापत्य विभागाच्या भांडवली कामांसाठी ६८ कोटींची वाढ करण्यात आली असून, बीआरटीएस विभागाच्या विशेष योजनांमध्ये ७२ कोटींची वाढ, सहा क्षेत्रीय कार्यालयांना रस्ते खोदाई व दुरुस्तीसाठी प्रत्येकी दहा कोटी याप्रमाणे ६० कोटींची वाढ करण्यात आली आहे. पाणीपुरवठा विभागाच्या नियमित व विशेष योजनांसाठी नऊ कोटींची वाढ, तर केंद्र शासनाच्या योजनांकरिता दहा कोटींची वाढ करण्यात आली आहे. तर, महसुली खर्च १ हजार २९९ कोटी इतका आहे. यामध्ये मागील वर्षीपेक्षा ७१ कोटींची वाढ झाली आहे. यासह केंद्र शासनाच्या योजनांसाठी ४८ कोटी, पाणीपुरवठा विशेष निधीसाठी ४२ कोटी, कर्ज निवारण निधी ५ कोटी, वाहन घसारा निधी १ कोटी तरतूद करण्यात केली आहे. (प्रतिनिधी)
> भक्ती-शक्तीपासून
होणार ‘ट्राम’ सेवा
पिंपरी : या वर्षीच्या अंदाजपत्रकात स्वच्छता, स्वच्छ पाणीपुरवठा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे सक्षमीकरण यास प्राधान्य देण्यात आले आहे. बीआरटीएससाठी वाढीव निधी देण्यासह पहिल्या टप्प्यात भक्ती-शक्ती ते कोकणे चौक या दरम्यान ट्राम सेवा सुरू करण्यासाठी तरतूद करण्यात आली असल्याचे आयुक्त राजीव जाधव म्हणाले. यासह या अंदाजपत्रकात करवाढ करण्यात आलेली नसली, तरी करवाढीचा प्रस्ताव महासभेपुढे ठेवला जाईल, असेही ते म्हणाले.
महापालिकेचे ३४वे अंदाजपत्रक आयुक्त जाधव यांनी स्थायी समितीला सादर केले. त्या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘या अंदाजपत्रकात पैसे वाचविण्याचा प्रयत्न केला आहे. कमी पैशात अधिकाधिक कामे करण्यावर भर दिला आहे.
नवीन गावांनाही निधी उपलब्ध करून देण्यासह शहरातील विकासकामांना प्राधान्य देण्यात आले आहे. अपूर्ण कामे पूर्ण करण्याकडे अधिक लक्ष देण्यात आले आहे. मात्र, अधिकाधिक शहर स्वच्छ राहण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. (प्रतिनिधी)
पुण्यावर स्मार्ट मात
पिंपरी : स्मार्ट सिटीत पिंपरी-चिंचवड शहरावर अन्याय झाला. ऐनवेळी डावलले गेले. मात्र, केंद्र सरकारच्या स्वच्छ शहरात उद्योगनगरीने पुण्यावर मात करीत राज्यात पहिला आणि देशात नववा क्रमांक मिळविला. पुण्यावर स्मार्ट मात केली. दोन हजारपैकी १५५९ गुण मिळविले आहेत.
बेस्ट सिटीचे बक्षीस मिळविणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहर स्मार्ट सिटीच्या स्पर्धेत आघाडीवर होते. पहिल्या यादीत या शहराचा समावेश पुण्याबरोबरच केला होता. यात केलेल्या गुणांकनात पिंपरीला ९२.५ टक्के गुण मिळाले होते. मात्र, पिंपरीबरोबर समावेश नको, ही भूमिका पुणेकरांनी घेतली. भाजपासह राष्ट्रवादीनेही त्या मागणीचे समर्थन केले आणि ऐनवेळी राजकारण होऊन पिंपरीचा पत्ता कट करण्यात आला. याविषयी राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, प्रशासनाने प्रयत्न केले. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, खासदार श्रीरंग बारणे, अमर साबळे, शिवाजीराव आढळराव-पाटील हे नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांना भेटले. मात्र, प्रयत्न करूनही उद्योगनगरीचा समावेश झाला नाही. गुणवत्ता असतानाही डावलल्याची सल पिंपरीकरांच्या मनात असताना स्वच्छ शहराच्या यादीत नाव झळकल्याने शहरवासीय आनंदात आहेत.
ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीने ही स्पर्धा घेण्यात आली. त्यासाठी दोन हजार गुणांची ही स्पर्धा घेण्यात आली होती. त्यात विविध सेवा, महापालिकेकडून होणारे प्रयत्न यासाठी हजार गुण, स्वच्छ भारत टीमकडून होणाऱ्या पाहणीसाठी पाचशे गुण, नागरिकांच्या प्रतिक्रियांसाठी पाचशे गुण ठेवण्यात आले होते. त्यापैकी विविध सेवा, स्वच्छ शहरासाठी होणारे प्रयत्न, घनकचरा व्यवस्थापन, मलनिस्सारण यासाठी ८११ गुण मिळाले.
(प्रतिनिधी)एकेकाळी आशिया खंडात सर्वांत श्रीमंत नगरपालिका म्हणून आपला गौरव केला जायचा. स्वच्छ भारत अभियान सर्वेक्षणात आपणास देशात पहिला क्रमांक मिळवायला हवा. देशात नववा क्रमांक मिळाला, ही आनंदाची बाब आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी अधिक प्रयत्न व्हायला हवेत. यापुढे आपण पहिल्या क्रमांकावर कसे येऊ, या दृष्टीने महापालिकेने प्रयत्न करायला हवेत.
- राहुल भोसले (विरोधी पक्षनेते)देशातील ७५ शहरांच्या केलेल्या सर्वेक्षणात आपणास यश मिळाले, ही आनंदाची बाब आहे. शहर स्वच्छ ठेवण्यात महापालिकेबरोबरच नागरिकांचीही जबाबदारी मोलाची आहे. नागरिकांनीही शहर स्वच्छ ठेवण्यात योगदान दिल्यास आपण भविष्यकाळात पहिल्या क्रमांकावर येण्यास वेळ लागणार नाही. स्वच्छतेविषयी जागृती करण्याची गरज आहे.
अतुल शितोळे (अध्यक्ष, स्थायी समिती)

Web Title: 1231 crore for 'smart' development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.