स्वाइनने घेतले जिल्ह्यात १२ जणांचे बळी
By Admin | Updated: March 17, 2015 23:14 IST2015-03-17T23:14:36+5:302015-03-17T23:14:36+5:30
नवीन वर्षात आतापर्यंत जिल्ह्यात स्वाइन फ्लूने १२ जणांचा बळी घेतला असून, जिल्हा प्रशासन अॅलर्ट झाले आहे.

स्वाइनने घेतले जिल्ह्यात १२ जणांचे बळी
पुणे : नवीन वर्षात आतापर्यंत जिल्ह्यात स्वाइन फ्लूने १२ जणांचा बळी घेतला असून, जिल्हा प्रशासन अॅलर्ट झाले आहे. जिल्ह्यात टॅमीफ्लूचा आवश्यक साठा असून, लहान मुलांसाठी ‘सायरस’ हे सिरफही उपलब्ध करून दिले आहे. जिल्हा परिषदेकडून १६० बाटल्या व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून १५० बाटल्या उपलब्ध झाल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एन. डी. देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
जिल्ह्यात सिरपही उपलब्ध होणार, असे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी ते उपलब्ध करून देण्याचे देशमुख यांना सांगितले होते. त्यानुसार १६० बाटल्या जिल्हा परिषदेकडून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
मृतांमध्ये बारामती, इंदापूर, खेडला प्रत्येकी २; तर आंबेगाव, हवेली, जुन्नर, मावळ, पुरंदर, दौंडला प्रत्येक १ रुग्णाचा मृत्यू झाला. यात नऊ पुरुषांचा व ३ महिलांचा समावेश आहे. स्वाइन फ्लूबाधित रुग्णांमध्ये १५ ते ५० वयोगटातील ७४ पैकी ५३ रुग्णांचा समावेश आहे. ५०च्या पुढे १३ व ० ते १४ वयोगटातील ८ रुग्ण सापडले.
११ मृत रुग्णांपैकी रुबीमध्ये ३ , नोबलमध्ये ३, पूना हॉस्पिटल २ , के.ई.एम १, वायसीएम १ , आदित्य बिर्लामध्ये १ रुग्णांचा उपचार घेताना मृत्यू झाला. (प्रतिनिधी)
हवेलीत
सर्वाधिक ३६
जिल्ह्यात आढळलेल्या एकूण ७६ रुग्णांपैकी हवेली तालुक्यात सर्वाधिक ३६ रुग्ण सापडले आहेत. त्यानंतर इंदापूरला ७, खेडला ७, बारामतीला ५, आंबेगाव, भोर, मावळ, पुरंदर, शिरूरला प्रत्येकी ३; तर दौंड, जुन्नर, मुळशीला २ रुग्ण सापडले.
टॅमीफ्लूचा मुबलक साठा
जिल्ह्यात प्रत्येक केंद्रावर टॅमीफ्लूच्या ४०० गोळ््या उपलब्ध आहेत. ४० रुग्णांना पुरू शकतील एवढा साठा उपलब्द असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.
सर्व स्तरावर प्रशिक्षण
जिल्हास्तरावर वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहायक, प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुकास्तरावर सर्व आरोग्य कर्मचारी व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांचेही प्रशिक्षण घेतले असून, संशयित रुग्णांवर कसे उपचार करायचे, याची माहिती देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा, अंगणवाड्या व आशांनाही याबाबत माहिती दिली आहे.