बारामतीतील ११,८७६ जनावरे दत्तक!
By Admin | Updated: February 2, 2015 23:12 IST2015-02-02T23:12:30+5:302015-02-02T23:12:30+5:30
बारामती तालुक्यातील २३ गावांमध्ये केंद्र शासन पुरस्कृत कामधेनू दत्तक ग्राम योजना कार्यान्वित झाली आहे. यात तालुक्यातील ११,८७६ जनावरांचा समावेश करण्यात आला आहे.

बारामतीतील ११,८७६ जनावरे दत्तक!
बारामती : बारामती तालुक्यातील २३ गावांमध्ये केंद्र शासन पुरस्कृत कामधेनू दत्तक ग्राम योजना कार्यान्वित झाली आहे. यात तालुक्यातील ११,८७६ जनावरांचा समावेश करण्यात आला आहे. यात ७,८५७ दुधाळ आणि ४,०१९ भाकड जनावरे आहेत. या योजनेंतर्गत एका दत्तक गावाकरिता १ लाख ५२ हजारांचा निधी उपलब्ध क रण्यात आला आहे.
महाराष्ट्रात शेतीबरोबरच पशुपालन हा जोडव्यवसाय म्हणून केला जातो. शेतकऱ्यांसाठी पशुधनाची किंमत त्याच्या अपत्यांइतकीचे मौल्यवान असते. मात्र, मागील काही वर्षांपासून दुष्काळ,चाराटंचाई यांच्याबरोबर विविध योजनांमुळे या पशुधनावर संकट आले होते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाने ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत दत्तक गावांत दुधाळ,भाकड संकरित गाई, देशी गाई, म्हशी यांची पशुगणना करण्यात येणार आहे. यातील अनुत्पादित जनावरांना दूध उत्पादित जनावरांच्या श्रेणीमध्ये आणून दूधउत्पादन वाढविणे हा या योजनेचा उद्देश आहे.
राज्य सरकारने दत्तक घेतलेल्या सर्व गावांतील पशुधनाची शेतकरीनिहाय अद्ययावत नोंदणी केली जाणार आहे. यामध्ये सध्याचे दुधाचे उत्पादन, उत्पादकता याची माहिती घेतली जाते. त्यानंतर पशुपालकांचे मंडळ स्थापन करून धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करण्यात येते. त्यानंतर प्रत्येक दत्तक गावात ग्रामसभा घेऊन जनावरांचे लसीकरण, चारा उत्पादनाचा वर्षभराचा कार्यक्रम निश्चित केला जातो.
वाढता दुष्काळ आणि चाराटंचाईचा बिकट प्रश्न यामुळे हैराण झालेल्या शेतकऱ्याला पशुधनाची जोड मिळावी, यासाठी ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. बारामती तालुक्यातील २३ गावांचा यात समावेश करण्यात आला आहे. तालुक्यातील कांबळेश्वर, शिर्सुफळ, काटेवाडी, सायबाची वाडी, येळेवस्ती, टेंगलवस्ती, खामगळवाडी, चोपडज, वाणेवाडी, खंडोबाची वाडी, मगरवाडी, शिरष्णे, आंबी बुद्रुक, वंजारवाडी, नीरावागज, डोर्लेवाडी, घाडगेवाडी, निंबोडी, उंडवडी सुपे, भिलारवाडी, मुर्टी, पानसरेवाडी, कानाडवाडी या गावांत या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत या २३ गावांत २३ प्रशिक्षण शिबिरे घेण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)
४या योजनेंतर्गत पशुपालक मंडळ स्थापन करण्यात येते. जंतनाशक शिबिरात जंतनाशक खरेदी करून ती उपलब्ध करून देण्यात येतात. खनिजद्रव्य मिश्रण व जीवनसत्त्वाचा पुरवठा करण्यात येतो.
४गोचिड,गोमाश्या निर्मूलन शिबिर
आयोजित करणे, वंधत्व निदान व औषधोपचार शिबिर,वैरण विकास कार्यक्रम, निकृष्ट चारा सकस करणे, जनावरांचे मलमूत्र व वाया गेलेल्या चाऱ्याचे खत व्यवस्थापन करणे या बाबींचा समावेश होतो.