शेतकऱ्यांना मिळणार ११५ कोटी भरपाई

By Admin | Updated: May 7, 2016 05:11 IST2016-05-07T05:11:50+5:302016-05-07T05:11:50+5:30

पुणे-नाशिक महामार्गाच्या भूसंपादनाचे काम वेगात सुरू आहे. आंबेगाव, जुन्नर, खेड या तालुक्यांतील ११ गावांमधील शेतकऱ्यांनी महामार्गासाठी आपल्या जमिनी दिलेल्या

115 crores compensation for farmers | शेतकऱ्यांना मिळणार ११५ कोटी भरपाई

शेतकऱ्यांना मिळणार ११५ कोटी भरपाई

घोडेगाव : पुणे-नाशिक महामार्गाच्या भूसंपादनाचे काम वेगात सुरू आहे. आंबेगाव, जुन्नर, खेड या तालुक्यांतील ११ गावांमधील शेतकऱ्यांनी महामार्गासाठी आपल्या जमिनी दिलेल्या असून, त्यांना जमिनीची नुकसानभरपाई देण्यासाठी ११५ कोटी रुपये जमा झाले आहेत. भरपाईची रक्कम मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी त्वरित प्रस्ताव सादर करावेत; अन्यथा २० मेनंतर हे पैसे दिवाणी न्यायालय राजगुरुनगर येथे जमा होतील, अशी माहिती भूसंपादन अधिकारी संजय पाटील यांनी दिली.
भांबुरवाडी, सांडभोरवाडी, जैदवाडी, पेठ, भोरवाडी क्र. १, भोरवाडी क्र. २, तांबडेमळा, भटकळवाडी, चाळकवाडी, नगदवाडी, कांदळी या ११ गावांचा यामध्ये समावेश आहे. येथून गेलेल्या महामार्गाच्या जमिनींच्या संपादनाच्या भरपाईची रक्कम शासनाकडून जमा झाली आहे. ही रक्कम मिळविण्यासाठी बाधित खातेदारांनी प्रस्ताव सादर करणे गरजेचे आहे. या पैशाची मागणी केली नाही, तर ही रक्कम दिवाणी न्यायालयात जमा होईल.
शेवाळवाडी, मोरडेवाडी, निघोटवाडी, एकलहरे, कळंब, मंचर, आळेफाटा, वडगाव आनंद या गावांमधील जमिनींचे निवाडे मंजूर होऊन आले आहेत. त्याच्या नोटिसा आठवड्यात निघतील. यासाठीदेखील शासनाकडून १५८ कोटी रुपये जमा झाले आहेत. त्याचेही तत्काळ वाटप केले जाणार आहे. ही रक्कम पुढील २ महिन्यांत खातेदारांनी घेतली नाही, तर तेही पैसे दिवाणी न्यायालयात जमा होतील. (वार्ताहर)

महसूल यंत्रणेमार्फत पंचनामे : मोबदला देण्यासाठी प्रयत्नशील
मोजण्यांमध्ये झाडे, घरे, विहिरी यांची भरपाई मिळाली नाही, अशा काहींच्या तक्रारी होत्या. याबाबतचे सर्व अर्ज घेण्यात आले आहेत. स्थानिक महसूल यंत्रणेमार्फत पंचनामे करून, मूल्यांकन करून त्याची नुकसानभरपाई मिळवी म्हणून राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. त्याचेही पैसे आल्याबरोबर वाटप केले जाईल. लोकांना जास्तीत जास्त मोबदला मिळावा, यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे संजय पाटील यांनी सांगितले.

नारायणगाव, वारुळवाडी यांचे प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे पाठविण्यात आले आहेत. त्यांच्याकडून मंजूर होऊन आल्याबरोबर येथील खातेदारांना नोटिसा निघतील. त्याचबरोबर राजगुरुनगर, राक्षेवाडी, होलेवाडी, चांडोली या गावांची भूसंपादन सुनावणी व निवडा करण्याचे काम तत्काळ सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एका वर्षात महामार्गाचे काम पूर्ण होणार
जिल्ह्यातून गेलेल्या पुणे-नाशिक महामार्गाचे काम वेगात सुरू आहे. पुढील एका वर्षात हा महामार्ग पूर्ण होईल. जमिनी देण्यास सुरुवातीच्या काळात लोकांनी तीव्र विरोध केला होता. नंतरच्या काळात लोकांसमवेत सतत बैठका घेऊन त्यांच्या शंकांचे निरसरन केल्यामुळे बहुतांश लोकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. काही ठिकाणी अडचणी असल्या तरी चर्चा करून त्यातून मार्ग काढला जाईल. यापूर्वी पेठ, नगदवाडी, काचळवाडी व अन्य गावांतील लोकांनी पैसे स्वीकारलेले असून, येथे ४० कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. - संजय पाटील, भूसंपादन अधिकारी

Web Title: 115 crores compensation for farmers