अकरा कोटींची फसवणूक; चार व्यावसायिकांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 01:00 IST2018-02-09T00:59:57+5:302018-02-09T01:00:09+5:30
कल्याणी टेक्नोथर्म लिमिटेड, कल्याणी टेक्नोवेल्ड प्रा. लि. आणि कल्याणी थर्मल प्रोसेसिंग प्रा. लि. या कंपन्यांमध्ये अकाऊंटिंग व बँकिंगचे काम करणा-या एकाने कंपनीच्या बँकेच्या विविध खात्यांवरून ११ कोटी २२ लाख ७९ हजार २१८ रुपये अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात उघडकीस आला.

अकरा कोटींची फसवणूक; चार व्यावसायिकांना अटक
पुणे : कल्याणी टेक्नोथर्म लिमिटेड, कल्याणी टेक्नोवेल्ड प्रा. लि. आणि कल्याणी थर्मल प्रोसेसिंग प्रा. लि. या कंपन्यांमध्ये अकाऊंटिंग व बँकिंगचे काम करणा-या एकाने कंपनीच्या बँकेच्या विविध खात्यांवरून ११ कोटी २२ लाख ७९ हजार २१८ रुपये अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात उघडकीस आला आहे. अपहार केलेली रक्कम त्याने लॉटरी खेळण्यासाठी वापरल्याचेदेखील निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी चार लॉटरी व्यावसायिकांना अटक केली आहे. गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी सरकारी वकील किरण बेंडभर यांनी चौघांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मंजूर केली.
दीपक भरत गायकवाड (वय ३३, रा. पर्वतीदर्शन), दिलीपकुमार गोवर्धनभाई अकबारी (४२, रा. सुयोग निवास, बालाजीनगर, धनकवडी) गणेश नंदकुमार पोटफोडे (३५) आणि महेश वसंत जाधव (४८, दोघेही रा. पर्वतीदर्शन) यांना अटक आरोपींची नावे आहेत. तसेच या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी नीलेश अशोक गायकवाड याचा मृत्यू झाला आहे. हा प्रकार २०१३ ते आॅगस्ट २०१७ या कालावधीत घडला.
याप्रकरणी कंपनीच्या फायनान्स विभागाचे उपाध्यक्ष कमलेश नलिन शाह (४४, रा. बोआविस्टा, कल्याणीनगर) यांनी याबाबत २८ आॅगस्ट २०१७ रोजी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
>तपासात उघड
शहा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, नीलेश गायकवाड हा सहायक व्यवस्थापक म्हणून काम करत होता.
त्यासाठी लॉटरी व्यावसायिक दीपक गायकवाड याच्याबरोबर ४९ लाख ४९ हजार, दिलीपकुमार अकबारी ४५ लाख ५० हजार, गणेश पोटेफोडे ३८ लाख ९९ हजार रुपये, तर महेश जाधव यांच्यासोबत तब्बल १ कोटी ६ लाख ६५ हजार रुपयांचे व्यवहार केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.