दहावीची परीक्षा रद्द झाली, पण पुढे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:14 IST2021-06-09T04:14:08+5:302021-06-09T04:14:08+5:30
पुणे : शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीचा निकाल तयार करण्यासंबंधीचे निकष नुकतेच जाहीर केले. येत्या जूनअखेर दहावीचा निकाल ...

दहावीची परीक्षा रद्द झाली, पण पुढे काय?
पुणे : शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीचा निकाल तयार करण्यासंबंधीचे निकष नुकतेच जाहीर केले. येत्या जूनअखेर दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. जे विद्यार्थी या निकालाबाबत समाधानी होणार नाहीत, त्यांच्यासाठी श्रेणी सुधार योजनेंतर्गत दोन संधी दिल्या जाणार असल्याचे शासनाने म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या मनातील गोंधळ, चिंता, प्रश्न आहेत. मुख्याध्यापक महामंडळाचे प्रवक्ते महेंद्र गणपुले यांनी या संदर्भात समाधान करण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रश्न : दहावीची परीक्षा होणार आहे का?
महाराष्ट्र सरकारने दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मूल्यमापन व अन्य बाबींसंदर्भात शंकानिरसन शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावरील ‘एफऐक्यू’त उपलब्ध आहे.
प्रश्न : परीक्षा नाही तर मग मूल्यांकन कसे होणार?
उत्तर : अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे मुलांना उत्तीर्ण करण्यात येणार आहे.
प्रश्न : अंतर्गत मूल्यांकन नेमकं कसं होणार?
उत्तर - दहावीच्या वर्षातील लेखी मूल्यमापनला ३० गुण असतील. दहावीचे गृहपाठ, तोंडी परीक्षा किंवा प्रात्यक्षिकातंर्गत २० गुण असतील. तसेच नववीचे विषयानिहाय गुण याला ५० गुण असतील. असे एकूण १०० गुणांचे मूल्यमापन असेल.
प्रश्न : म्हणजे दहावीचे सरसकट सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होतील का?
उत्तर : जर एखाद्या विद्यार्थ्याने लेखी मूल्यमापन, गृहपाठ किंवा तोंडी परीक्षा योग्यप्रकारे दिली नसेल, किंवा नववीलाही काठावर उत्तीर्ण असेल तर त्याच्या निकालाबाबत सरसकट उत्तीर्ण असं होणार नाही.
प्रश्न : मला मिळालेले दहावीचे गुण मान्य नसतील तर काय?
उत्तर : दहावीचे गुण मान्य नसतील तर तुम्हाला श्रेणी सुधारची संधी असेल. कोविड परिस्थिती सुधारल्यानंतर तुम्हाला परत परीक्षा देता येईल.
प्रश्न : इयत्ता अकरावीचा प्रवेश कसा होणार?
उत्तर : इयत्ता अकरावी प्रवेशासाठी वैकल्पिक (ऑप्शनल) ‘सीईटी’ परीक्षा आयोजित केली जाईल. या परीक्षेत बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील.
प्रश्न : अकरावीसाठी ‘सीईटी’ परीक्षेतील प्रश्न कोणत्या आधारे विचारणार?
उत्तर : इयत्ता अकरावीच्या प्रवेश परीक्षेत राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारले जातील.
प्रश्न : इयत्ता अकरावीची ‘सीईटी’ परीक्षा किती गुणांची?
उत्तर : ही परीक्षा शंभर गुणांची असेल.
प्रश्न : इयत्ता अकरावीचे प्रवेश कसे होणार?
उत्तर : ‘सीईटी’ परीक्षेच्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार महाविद्यालयात प्रवेश दिला जाईल. ही परीक्षा देणाऱ्यांना अकरावी प्रवेशप्रक्रियेत प्राधान्य दिले जाईल.
प्रश्न : ‘सीईटी’ न दिलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावीत प्रवेश कसा मिळणार?
उत्तर : ‘सीईटी’ परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर उर्वरित विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल. ही परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन इयत्ता दहावीच्या मूल्यमापन पद्धतीनुसार होईल.
चौकट
असा लागेल दहावीचा निकाल
नियमित विद्यार्थी :
वर्षातील लेखी मूल्यमापन - ३० गुण
दहावीचे गृहपाठ, तोंडी किंवा प्रात्यक्षिक अंतर्गत - २० गुण
नववीचे विषयानिहाय गुण - ५० गुण