जुन्नर तालुक्यातील १0८ उमेदवार रिंगणात
By Admin | Updated: February 14, 2017 01:44 IST2017-02-14T01:44:14+5:302017-02-14T01:44:14+5:30
जुन्नर तालुक्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी एकूण १0८ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. जिल्हा परिषदेच्या

जुन्नर तालुक्यातील १0८ उमेदवार रिंगणात
जुन्नर : जुन्नर तालुक्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी एकूण १0८ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. जिल्हा परिषदेच्या ७ जागांसाठी ३९ उमेदवार, तर पंचायत समितीसाठी १४ जागांसाठी ६९ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी तबबल ५३ उमेदवारांची माघार झाली.
पंचायत समितीच्या ३१ उमेदवारांनी माघार घेतली, तर जिल्हा परिषदेच्या २२ उमेदवारांनी माघार घेतली, अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी कल्याण पांढरे यांनी दिली.
पक्षाने उमेदवारी नाकारल्याने अनेकांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून बंडखोरी केली होती. तर, काहींनी थेट पक्षांतर करून दुसऱ्या पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल केले होत. त्यामुळे बंडखोर उमेदवारांच्या माघारीकडे तालुक्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. सर्वच पक्षात कमी-अधिक प्रमाणात नाराजीनाट्य दिसून आले. तालुक्याच्या पूर्व भागातील राजुरी बेल्हे गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते वल्लभ शेळके यांनी पक्षाने उमेदवारी नाकारल्याने दाखल केलेला अपक्ष उमेदवार अर्ज कायम ठेवला आहे. त्यामुळे या गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार यांच्या पुढील आवाहन वाढले आहे.
निरगुडे पंचायत समिती गणातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पोपट रावते, केशव वायाळ, हरिभाऊ नवले,युवराज लांडे, मारुती वारे यांनी पाडळी गणातून आपली उमेदवारी मागे घेतली आहे. तसेच, अतुल आहेर,अजित बांगर यांनीदेखील माघार घेतली आहे. निरगुडे गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रोहिदास नवले यांनी पक्षाने उमेदवारी नाकारल्याने दाखल केलेला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. तसेच, निरगुडे गणातील शिवसेनेचे कार्यकर्ते सचिन चव्हाण यांनी शिवसेनेने उमेदवारी न दिल्याने दाखल केलेली अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळे या गणातील शिवसेनेचे उमेदवार दिलीप गांजाळे यांची डोकेदुखी वाढली आहे.(वार्ताहर)