मावळात १०५ बालके कुपोषणमुक्त
By Admin | Updated: October 31, 2015 01:07 IST2015-10-31T01:07:53+5:302015-10-31T01:07:53+5:30
पुणे जिल्हा परिषदेने जिल्हा कुपोषणमुक्त करण्याचा निर्धार केला असून, प्रायोगिक तत्त्वावर लायन्स कल्बच्या मदतीने मावळ तालुक्यात सुरू केलेल्या ‘ग्रामबालविकास केंद्रा’ला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

मावळात १०५ बालके कुपोषणमुक्त
पुणे : पुणे जिल्हा परिषदेने जिल्हा कुपोषणमुक्त करण्याचा निर्धार केला असून, प्रायोगिक तत्त्वावर लायन्स कल्बच्या मदतीने मावळ तालुक्यात सुरू केलेल्या ‘ग्रामबालविकास केंद्रा’ला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तालुक्यातील तीन आठवड्यांत २३ बालकांचा श्रेणीबदल झाला असून १०५ बालके कुपोषणमुक्त झाली आहेत.
२१ आॅक्टोबर २०१५ रोजी पुणे जिल्हा परिषद, महिला व बालकल्याण विभागांतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या वतीने कुपोषण निर्मूलन अभियान कार्यशाळा आयोजिण्यात आलेली होती. त्यात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी वर्षात जिल्हा कुपोषणमुक्त करण्याचा निर्र्धार केला आहे.
यात पूरक पोषण आहार, लसीकरण, आरोग्य तपासणी, संदर्भ आरोग्यसेवा, आरोग्य आणि सकस आहारविषयक शिक्षण, औपचारिक शालेय पूर्व शिक्षण इ. सहा महत्त्वाच्या सेवा दिल्या जाणार आहेत. जिल्ह्यात २१ प्रकल्पांच्या माध्यमातून अंगणवाड्या कार्यरत असून तेथे हा प्रयोग करण्यात येणार आहे.
दिवाळी सुट्टया आल्याने इतर तालुक्यात हा प्रयोग डिसेंबरपासून राबविण्यात येणार असून यासाठीचा खर्च ग्रामपंचायतीच्या निधीतून करण्यात येणार आहे.
मावळ तालुक्यात हा प्रयोग लायन्स क्लब वडगावच्या माध्यमातून ८ सप्टेंबर रोजी सुरू करण्यात आला होता. यात एका महिन्यासाठी बालविकास केंद्र तयार करण्यात आले आहे. या केंद्रामार्फत लायन्सच्या माध्यमातून बालकांना पूरक आहार देण्यात येत आहे. यात पोषक शेंगदाणा लाडू, केळी, सफरचंद, बटाटा व तीन प्रकारची औषधे दिली जात आहेत. तीन आठवड्यांपूर्वी मावळ तालुक्यात तीव्र कुपोषित ३१ बालके व मध्यम कुपोषित २०८ बालके होती. २९ आॅक्टोबर रोजी यातील २३ बालकांचा श्रेणीबदल झाला, तर १०५ बालके कुपोषणातून बाहेर आली आहेत. अजून एक आठवडा असून तालुका कुपोषणमुक्त होईल, असा विश्वास या केंद्रातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.