बारामतीत होणार कामगारांसाठी १०० बेडचे ‘इएसआयसी’ रुग्णालय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 04:57 PM2023-01-28T16:57:49+5:302023-01-28T16:58:58+5:30

बारामतीसह ७ तालुक्यांतील औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लाभ होणार...

100-bed 'ESIC' hospital for workers will be built in Baramati | बारामतीत होणार कामगारांसाठी १०० बेडचे ‘इएसआयसी’ रुग्णालय

बारामतीत होणार कामगारांसाठी १०० बेडचे ‘इएसआयसी’ रुग्णालय

googlenewsNext

बारामती (पुणे) : येथे केंद्र सरकारने शंभर बेडचे इएसआयसी रुग्णालय मंजूर केले आहे. त्याचा बारामतीसह ७ तालुक्यांतील औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. यासाठी केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांचे खासदार सुप्रिया सुळे यांनी आभार मानले असून, कामगारांची संख्या पाहता आणखी शंभर बेडची गरज सुळे यांनी व्यक्त केली आहे.

बारामती लोकसभा मतदार संघातील बारामती, दौंड, जेजुरी, इंदापूर या तालुक्यांत मोठ्या औद्योगिक वसाहती आहेत. याबरोबरच शेजारच्या तालुक्यांतील फलटण, माढा व श्रीगोंदा येथेही औद्योगिक वसाहती असून तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही बारामती येथे होत असलेल्या इएसआयसी रुग्णालयाचा लाभ घेता येणार आहे. या सर्व औद्योगिक वसाहतींचा विचार करता सातही वसाहतींमधील विविध कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांची संख्या खूप मोठी आहे. त्यांच्यासाठी बारामती येथे सर्व सुविधांनी युक्त इएसआयसी रुग्णालयाची गरज आहे. इतकेच नाही, तर ते किमान दोनशे बेडचे असणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी खासदार सुप्रिया सुळे या गेल्या काही दिवसांपासून पाठपुरावा करत होत्या. बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचाही यासाठी पाठपुरावा सुरू होता.

याबाबतचा प्रस्ताव देखील केंद्रीय कामगार मंत्र्यांकडे सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून, शंभर बेडचे रुग्णालय मंजूर करण्यात आले आहे. याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना खासदार सुळे यांनी इएसआयसी रुग्णालय मंजूर झाले, ही अतिशय आनंदाची बाब आहे. त्याचे आम्ही स्वागतच करतो; मात्र एकूण सात औद्योगिक वसाहतींमध्ये काम करणाऱ्या कामगारांना या रुग्णालयाचा फायदा होणार आहे. त्यांची संख्या पाहता रुग्णालय किमान दोनशे बेडचे असणे आवश्यक आहे. याबाबत केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव नक्कीच सकारात्मक विचार करतील, असा विश्वासही खासदार सुळे यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: 100-bed 'ESIC' hospital for workers will be built in Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.