लैंगिक अत्याचारप्रकरणी १० वर्षे सक्तमजुरी
By Admin | Updated: September 1, 2015 04:13 IST2015-09-01T04:13:07+5:302015-09-01T04:13:07+5:30
अल्पवयीन मुलीवर अमानुषपणे लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एकास न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

लैंगिक अत्याचारप्रकरणी १० वर्षे सक्तमजुरी
पुणे : अल्पवयीन मुलीवर अमानुषपणे लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एकास न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. विशेष न्यायाधीश (अतिरिक्त) एस. जे. काळे यांनी ही शिक्षा सुनावली. सचिन हरिश्चंद्र कांबळे (वय ३०, संघर्ष बालग्राम, थेरगाव) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे. खटल्यात पीडित मुलगी, तिची चुलती, डॉक्टर व एका सामाजिक कार्यकर्त्या महिलेची साक्ष महत्त्वाची ठरली.
पीडित मुलीच्या चुलतीने याप्रकरणी हिंजवडी पोलिसांत फिर्याद दिली होती. एप्रिल २०१४ मध्ये हा प्रकार घडला. आईच्या मृत्यूनंतर तेरा वर्षीय पीडित मुलगी व तिच्या भावाचा सांभाळ त्यांचे वडील व्यवस्थितपणे करीत नव्हते. त्यामुळे ते दोघेही चुलतीकडे राहत होते. यादरम्यान संघर्ष बालग्राम ही संस्था चालविणारा सचिन कांबळे व त्याची पत्नी पीडित मुलगी राहत असलेल्या परिसरात आले. त्यांनी पीडित मुलीच्या चुलतीला भेटून आपली संस्था अनाथ मुलांच्या शिक्षण व निवासाची व्यवस्था मोफत करते, असे सांगितले. हे ऐकून मुलीला जुलै २०१३ मध्ये संस्थेत पाठविण्यात आले. दोघे पती-पत्नी मुलीसह इतर मुलांवर देखरेख ठेवत होते. एप्रिल २०१४ मध्ये परीक्षा संपल्यानंतर काही दिवसांत दोघा पती-पत्नीचे भांडण झाले. त्यानंतर सचिनने पत्नीला घराबाहेर काढले.
ही संधी साधून सचिनने मध्यरात्री एकच्या सुमारास पीडित मुलीच्या रुममध्ये जाऊन तिचे तोंड दाबून व दमदाटी करून लैंगिक अत्याचार केले. दुसऱ्या दिवशी त्याने तिच्यावर अत्याचार केले. यादरम्यान शाळेला सुट्टी लागल्याने मुलगी घरी चुलतीकडे आली. पण भीतीमुळे झालेला प्रकार तिने घरी सांगितला नाही. जून महिन्यात सचिनने चुलतीला दूरध्वनी करून मुलीला शाळा सुरू होण्यापूर्वी संस्थेत पाठविण्यास सांगितले. पुन्हा संस्थेत जावे लागणार असल्याचे लक्षात आल्याने घाबरून गेलेल्या पीडित मुलीने चुलतीला आपल्यासोबत झालेला प्रकार सांगितला. चुलतीने हिंजवडी पोलीस ठाण्यात त्याविरोधात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी सचिनला दि. ५ जून २०१४ रोजी अटक केली.