तपासण्यांचा वेग वाढवण्यासाठी १ लाख ९० हजार अँटिजेन किट घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:19 IST2021-05-05T04:19:30+5:302021-05-05T04:19:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. अशा स्थितीत नवे रूग्ण ...

1 lakh 90 thousand antigen kits will be taken to speed up the investigation | तपासण्यांचा वेग वाढवण्यासाठी १ लाख ९० हजार अँटिजेन किट घेणार

तपासण्यांचा वेग वाढवण्यासाठी १ लाख ९० हजार अँटिजेन किट घेणार

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. अशा स्थितीत नवे रूग्ण शोधण्यासाठी अँटिजेन चाचण्या आणि आरटीपीसीआर चाचण्या केल्या जात होत्या. मात्र, काही दिवसांपासून अँटिजेन किटचा तुटवडा असल्यामुळे या चाचण्या बंद होत्या. परिणामी आरटीपीसीआर चाचण्या वाढवण्याच्या सूचना केल्या होत्या. अँटिजेन किटचा तुटवडा भरून काढण्यासाठी नव्या पुरवठादाराकडे जवळपास १ लाख ९० हजार अँटिजेन किटची मागणी केली असून, येत्या दोन ते तीन दिवसांत या किटचा पुरवठा जिल्ह्याला होईल, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक अशोक नांदापूरकर यांनी दिली.

कोराेनाबाधितांची चाचणी करण्यासाठी अँटिजेन चाचण्या जिल्ह्यात सुरू होत्या. त्यासोबतच आरटीपीसीआर चाचण्याही सुरू होत्या. मात्र, अँटिजेन किट संपल्याने जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत अँटिजेन चाचण्या बंद झाल्या. त्यात नव्या अँटिजेन किटची मागणी आरोग्य विभागामार्फत नोंदवण्यात आली होती. मात्र, हापकीन संस्थेने या किटचे दर ५६ रुपये ठरवून दिले असतानाही किट उपलब्ध नसल्याने या किटच्या किमती ५६ वरून १२३ रूपयांपर्यंत गेली होती. यामुळे जुन्या पुरवठादाराने ५६ रुपयांनी किट पुरवण्यास नकार दिला. यामुळे नव्या दराने अँटिजेन किट खरेदीसाठी साेमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यात हापकिन संस्थेशी चर्चा करून नवे दर निश्चित करून नव्या पुरवठादाराकडून किट खरेदी केले जाईल असे ठरले. त्यानुसार लवकरच नव्या पुरवठादाराला १ लाख ९० हजार डोसची ऑर्डर दिली जाणार आहे, यातील १० हजार किट दोन दिवसांत जिल्ह्याला मिळेल, असे नांदापूरकर म्हणाले.

Web Title: 1 lakh 90 thousand antigen kits will be taken to speed up the investigation