१ लाख ७३ हजार बालकांना दिली जाणार न्यूमोनियाची लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:13 IST2021-07-14T04:13:41+5:302021-07-14T04:13:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना हा न्यूमोनियासदृश आजार असून, संभाव्य तिसऱ्या लाटेत बालके बाधित होण्याची शक्यता तज्ज्ञांनी ...

१ लाख ७३ हजार बालकांना दिली जाणार न्यूमोनियाची लस
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना हा न्यूमोनियासदृश आजार असून, संभाव्य तिसऱ्या लाटेत बालके बाधित होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे बालंकाना इतर लसींबरोबर आता न्यूमोनिया रोखण्यासाठी वापरली जाणारी न्यूमोकोकल कॅजुलेट ही लस मोफत दिली जात आहे. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील १ लाख ७३ हजार ३३८ बालकांचे पुढील एक वर्षात लसीकरण केले जाणार आहे. राष्ट्रीय लसीकरण मोहिमेंतर्गत लहान बालकांना गोवर, रुबेला, रोटाव्हायरस, हेपॅटायपीस बी यांसारख्या आजारांचा धोका असतो. या आजारांपासून त्यांना वाचवण्यासाठी तसेच त्यांच्या प्रतिकार क्षमतेत वाढ करण्यासाठी साधारण पाच वर्षांपर्यंत विविध लसी दिल्या जातात. त्यात आता न्यूमोकोकल कॅजुलेटची भर पडली आहे. खासगी रुग्णालयांमध्ये या लसीच्या एका डोसची पाच हजार रुपये किंमत आहे. प्रत्येक बालकांना टप्पेनिहाय तीन डोस दिले जाणार आहेत. ही सर्व लस प्राथमिक, उपआरोग्य केंद्रांत व शासकीय रुग्णालयात मोफत दिली जाणार आहे.
चौकट
दोन वर्षांच्या आतील मुलांना न्यूमोनिया होण्याचा अधिक धोका आहे. रुग्णालयात येणारा खर्च अधिक असल्याने ते सर्वसामान्य पालकांना परवडणारे नाही. त्यामुळे न्यूमोनिया होऊच नये यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने न्यूमोकोकल कॅजुलेट ही लस दिली जाणार आहे. त्याची सुरुवात झाली आहे. पहिला डोस वयाच्या सहाव्या आठवड्यांत, दुसरा १४ आठवडे आणि तिसरा डोस नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर दिला जाणार आहे.