सणसवाडीत पिकवला १ किलोचा पेरू

By Admin | Updated: January 30, 2017 02:41 IST2017-01-30T02:41:42+5:302017-01-30T02:41:42+5:30

सणसवाडी औद्योगिक क्षेत्रात कंपनी, गोडाऊन, रहदारी यांमुळे संपूर्ण परिसर व्यापलेला आहे. येथील तरुणही नोकरी-व्यवसायांच्या माध्यामातून पुढे जात आहे

1 kg Peru grows in Sansevadi | सणसवाडीत पिकवला १ किलोचा पेरू

सणसवाडीत पिकवला १ किलोचा पेरू

सुनील भांडवलकर,कोरेगाव भीमा
सणसवाडी औद्योगिक क्षेत्रात कंपनी, गोडाऊन, रहदारी यांमुळे संपूर्ण परिसर व्यापलेला आहे. येथील तरुणही नोकरी-व्यवसायांच्या माध्यामातून पुढे जात आहे. शेती व्यवसायाकडे मात्र दुर्लक्ष केलेले पाहावयास मिळत असतानाच सणसवाडी येथील शेतकरी नवनाथ भुजबळ, अनिल दरेकर, मच्छिंद्र हरगुडे यांनी आपल्या १८ एकर क्षेत्रात ‘रायपूर’ पेरूची आधुनिकरीत्या सेंद्रिय पद्धतीने लागवड करून बाग उभी केली आहे. १८ महिन्यांतच तब्बल १ किलोचा एक पेरू पिकविल्याने परिसरात या पेरूंना मोठी मागणी आहे.
सणसवाडीचे ग्रामपंचायत सदस्य नवनाथ भुजबळ, अनिल दरेकर, मच्छिंद्र हरगुडे या तिघांनी समाईक १८ एकर क्षेत्रावर पेरूची आधुनिक लागवड करण्याचा निर्णय घेऊन ‘रायपूर’ जातीच्या पेरूची लागवड केली. याच जातीची लागवड का करायची, यासाठी त्यांनी त्याचा संपूर्ण अभ्यासही केला. या १८ एकर क्षेत्रात तब्बल ८ हजार रोपांची लागवड त्यांनी एप्रिल २०१५मध्ये केली आहे. लागवडीनंतर या झाडाला १८ महिन्यांनंतर फळे येतात.
सध्या त्यांची बाग १८ महिन्यांची पूर्ण झालेली असून, त्यांनी एक एकर क्षेत्रातीलच झाडांवर फळाचा बार धरलेला आहे. मात्र, उर्वरित १७ एकरांवरील बागेचा बार पुढील मे महिन्यासाठी घेतला जाणार आहे. या वर्षीचा एक एकरावरील बागेतील पेरूला सुमारे एक किलोपेक्षा मोठी फळे आलेली आहेत.
रायपूर जातीचा हा पेरू इतर फळांपेक्षा अधिक टिकाऊ असून, शीत वातावरणात सुमारे एक महिना, तर उघड्या वातावरणात तीन महिने टिकतो.
या फळामध्ये बियांचे प्रमाणीही खूपच कमी असून, खाण्यासही खूपच चवदार आहे. तसेच, साखररहित असल्याने तो डायबेटीस रुग्णांसाठी उपयुक्त आहे. हा पेरू देशात कोणत्याही बाजारपेठेत विकला जातो. परदेशातही त्याला मोठी मागणी आहे. या फळाला किलोला ७० ते ८० रुपये बाजाराभाव असून, एकरी उत्पादन सुमारे अडीच लाखांपर्यंत आहे.

Web Title: 1 kg Peru grows in Sansevadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.