कोरोनाची पुन्हा लागण होण्याची शक्यता १-२ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:12 IST2021-07-14T04:12:43+5:302021-07-14T04:12:43+5:30
पुणे : कोरोनाची लागण होऊन गेल्यानंतर विकसित होणाऱ्या अंँटिबॉडी किती दिवस टिकतात, पुन्हा लागण होण्याची शक्यता किती असते, ...

कोरोनाची पुन्हा लागण होण्याची शक्यता १-२ टक्के
पुणे : कोरोनाची लागण होऊन गेल्यानंतर विकसित होणाऱ्या अंँटिबॉडी किती दिवस टिकतात, पुन्हा लागण होण्याची शक्यता किती असते, याबाबत विविध स्तरांवर संशोधन सुरू आहे. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलतर्फे याबाबतचे संशोधन करण्यात आले आहे. संशोधनानुसार, १०८० लोकांपैकी केवळ १३ लोकांना कोरोनाची पुन्हा लागण झाली. एकदा कोरोना होऊन गेल्यानंतर पुन्हा लागण होण्याचे प्रमाण केवळ १.२० टक्केच असल्याचा निष्कर्ष पुढे आला आहे.
साथरोगतज्ज्ञ आणि वैद्यकतज्ज्ञांच्या टीमकडून पिंपरी चिंचवड परिसरात सिरो सर्वेक्षण करण्यात आले होते. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील ५००० लोकांचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये ३४ टक्के लोकांमध्ये कोरोनाविरोधात अँटिबॉडी विकसित झाल्याचे दिसून आले. यावर्षी जून महिन्यात १७०० लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यापैकी १०८० लोकांशी संपर्क झाला. त्यांचा फॉलो अप घेतला असता, १०८० लोकांपैकी केवळ १३ लोकांना कोरोनाची लागण झाली. त्यांना झालेली लागणही सौम्य स्वरुपाची होती. म्हणजेच, सिरो सर्वेक्षणानंतर ८ महिन्यांनी बहुतांश लोकांच्या शरीरात आयजीजी अँटिबॉडी उपस्थित असल्याचे दिसून आले. नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती दीर्घकाळ टिकू शकते, याचा प्रत्यय आल्याची माहिती मुख्य संशोधक अमितव बॅनर्जी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेनंतर लागण होऊन गेलेल्या लोकसंख्येमध्ये विकसित होणाऱ्या अँटिबॉडी किमान वर्षभर राहू शकतात, असे जगभरातील शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. एकदा कोरोना होऊन गेल्यावर पुन्हा लागण होण्याची शक्यता कमी असते, असेही निष्कर्ष समोर येत आहेत. त्यामुळेच तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी असेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, कोरोना विषाणूचे नवनवीन व्हेरियंट समोर येत असताना शरीरात कोरोनानंतर विकसित झालेली नैसर्गिक रोगप्रतिकारकशक्ती अथवा लसीकरणानंतर विकसित झालेली रोगप्रतिकारकशक्तीची परिणामकारकता कमी होते का, याबद्दलही अभ्यास सुरु आहे.
-------------------
एकदा कोरोना होऊन गेल्यावर पुन्हा लागण होण्याची शक्यता १-२ टक्केच असल्याचा निष्कर्ष अभ्यासातून समोर आला आहे. लसीकरणानंतर निर्माण होणाऱ्या अँटिबॉडीप्रमाणेच कोरोनाची लागण होऊन गेल्यावर विकसित होणारी नैसर्गिक रोगप्रतिकारकशक्तीही दीर्घकाळ टिकू शकते. अँटिबॉडीचे प्रमाण कमी झाले तरी टी-सेल, मेमरी सेल शरीरात सक्रिय होतात.
- अमितव बॅनर्जी