"उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी चमकोगिरी सोडून शिक्षण व्यवस्थेच्या सुधारणेवर लक्ष द्यावं"

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2021 03:02 PM2021-02-14T15:02:44+5:302021-02-14T15:06:26+5:30

भाजप आमदार अतुल खातखळकर यांचं टीकास्त्र

Uday Samant should concentrate on improving the education system says bjp mla atul bhatkhalkar | "उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी चमकोगिरी सोडून शिक्षण व्यवस्थेच्या सुधारणेवर लक्ष द्यावं"

"उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी चमकोगिरी सोडून शिक्षण व्यवस्थेच्या सुधारणेवर लक्ष द्यावं"

Next

मुंबई : विद्यापीठातील समस्या समजून घेण्याचे कारण पुढे करत स्वतःच्या प्रसिद्धीसाठी 'उच्चशिक्षण मंत्रालय @ वरळी' असे जनता दरबाराचे कार्यक्रम आयोजित करायचे आणि या कार्यक्रमाच्या खर्चाचा बोजा अगोदरच कोरोनामुळे अपुरा निधी मिळत असल्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या विद्यापीठांवर टाकण्याचा घाट ठाकरे सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घातला आहे. विद्यापीठांशी संबंधित विषयाचा कार्यक्रम वरळीला घेऊन ‘युवराजांना’ खुश करण्याचा प्रयत्न त्यांनी चालविला आहे. आपली जबाबदारी ओळखून राज्यातील शिक्षण व्यवस्थेच्या सुधारणेवर भर देण्याचे सोडून उच्च शिक्षणमंत्र्यांनी केवळ चमकोगिरी करण्याचे काम सुरू केले असल्याची टीका भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे  आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. 

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे मंत्री झाल्यानंतर पहिल्याच महिन्यात त्यांच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्याने सर्व विद्यापीठांना पत्र लिहून त्यांच्या कंत्राटाची माहिती मागितली होती, त्यातून ह्या मंत्र्यांना शिक्षण व्यवस्थेत रस नसून केवळ कंत्राट व आर्थिक बाबीमध्येच जास्त रस असल्याचे दाखवून दिले होते. मुळात कायद्यानुसार विद्यापीठ ही एक स्वायत्त संस्था आहे, राज्याचे राज्यपाल हे या सर्व विद्यापीठांचे प्रमुख आहेत. त्यामुळे विद्यापीठाच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्याचा कोणताही अधिकार उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांना नाही. तरीही जर त्यांना विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्या समस्या जाणून घ्यायच्या असतील तर त्यांनी विद्यापीठाची रीतसर परवानगी घेऊन प्रत्येक विद्यापीठाच्या सभागृहात असे कार्यक्रम घ्यावेत. यात आणखी धक्कादायक बाब म्हणजे हा खर्च मुंबई विद्यापीठ व एसएनडीटी विद्यापीठांना करण्यास सांगण्यात आले आहे, असे करताना विद्यापीठ नियामक मंडळाची कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही, कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कंत्राट कोणाला द्यायचे हे सुद्धा अगोदरच ठरविण्यात आले आहे. कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढत असताना आणि मुंबई, नवी मुंबई व ठाणे या महानगरपालिकांनी महाविद्यालये सुरू करण्यासाठी अद्याप परवानगी नसताना सुद्धा एवढा मोठा कार्यक्रम घेऊन उच्चशिक्षणमंत्री काय साध्य करणार आहेत असा प्रश्न सुद्धा आमदार  भातखळकर यांनी केला आहे.

केंद्र सरकारच्या नवीन शिक्षण प्रणालीनुसार राज्यातील शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक जिल्ह्यात संशोधन केंद्र, प्रशिक्षण केंद्र, रोजगार संवाद केंद्र अशा संस्थांची उभारणी करण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थी व पालक यांच्यावर वाढत चाललेला खर्चाचा ताण कमी व्हावा, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न मार्गी लागावा आणि जास्तीतजास्त युवकांना रोजगार कसा मिळेल यासाठी आणि राज्यातील महाविद्यालयांच्या व विद्यार्थ्यांच्या समस्येची सोडवणूक व्हावी यासाठी विद्यापीठांना अधिक स्वावलंबी कसे बनविता येईल यासाठी उच्चशिक्षण मंत्र्यांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. परंतु तसे न करता केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठी निर्णय घ्यायचे आणि त्यातून गोंधळ माजवण्याचेच सत्रच उच्च शिक्षण मंत्र्यांनी चालविले आहे, ऑनलाईन परीक्षेत गोंधळ, निकालात गोंधळ, महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेत गोंधळ आणि आता विद्यापाठींच्या अखत्यारीत असलेल्या विषयांत हस्तक्षेप करून राज्याच्या शिक्षण व्यवस्थेत गोंधळ माजविण्याचे काम उदय सामंत करीत असल्याचा आरोप सुद्धा आमदार भातखळकर यांनी केला आहे.

उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी युवराजांच्या बाल हट्टापायी व स्वतःच्या प्रसिद्धीसाठी घेत असलेला 'उच्चशिक्षण मंत्रालय @ वरळी' हा कार्यक्रम तात्काळ रद्द करावा, अशी आग्रही मागणी सुद्धा आमदार भातखळकर यांनी केली आहे.

 

Web Title: Uday Samant should concentrate on improving the education system says bjp mla atul bhatkhalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.