पुणे - स्थानिकांच्या विरोधामुळे पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथे नियोजित असलेला विमानतळ चर्चेत असतो. मात्र आता या पुरंदर येथील नियोजित विमानतळावरून महाविकासआघाडीमध्येच वाद पेटण्याची चिन्हे दिसून लागली आहेत. पुरंदरमधील नियोजित विमानतळ बारामतीला पळवण्याचा शरद पवार यांचा डाव असल्याचा आरोप शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी केला आहे. असे असले तरी हा विमानतळ कुठल्याही परिस्थितीत पुरंदरहून बारामतीला नेऊ देणार नाही, असा इशारा विजय शिवतारे यांनी दिला आहे.विजय शिवतारे यांनी आज पत्रकार परिषद घेत शरद पवार यांच्यावर जोरदार आरोप केले. शिवतारे म्हणाले की, पुरंदरमधील प्रस्तावित विमानतळ जागा बदलून बारामतीच्या सीमेवर नेण्याचा घाट घालण्यात आला आहे. या विमानतळाची आधीची जागा बदलून नव्याने पुरंदर तालुक्यातील काही गावांची जागा घेऊन विमानतळाचे प्रवेशद्वार बारामतीचा विकास साधेल. तर विमानतळामागे पुरंदरमध्ये झोपडपट्टी वाढणार. हे कारस्थान हाणून पाडण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असा इशारा, शिवतारे यांनी दिला आहे.
"पुरंदरमधील नियोजित विमानतळ बारामतीला पळवण्याचा डाव", शिवसेनेच्या बड्या नेत्याची शरद पवारांवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2021 23:48 IST