शरद पवार : दूरदृष्टीचा आणि लोकाभिमुख नेता

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 07:03 PM2020-12-12T19:03:52+5:302020-12-12T19:05:12+5:30

Sharad Pawar Birthday : पवार यांच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा देशाच्या, विशेषत: महाराष्ट्राच्या सर्व क्षेत्रांवर जाणवतो. पवार हे केवळ राजकीय नेते नाहीत. त्यांनी विविध क्षेत्रांत आपल्या कार्यक्षमतेच्या, दूरदृष्टीचा आणि लोकाभिमुख प्रकृतीचा परिचय दिलेला आहे.

Sharad Pawar: A visionary and people-oriented leader | शरद पवार : दूरदृष्टीचा आणि लोकाभिमुख नेता

शरद पवार : दूरदृष्टीचा आणि लोकाभिमुख नेता

Next

नितीन गडकरी
(केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री)

गेल्या पाच दशकांहून अधिक काळ अखंड लोकसेवा करीत असलेले ज्येष्ठ नेते, पद्मविभूषण शरद पवार यांचा आज ऐंशीवा जन्मदिन आहे. त्यानिमित्त ‘लोकमत’ने त्यांच्यावर विशेषांक काढण्याचे जे औचित्य दाखविले, ते कौतुकास्पद आहे. पवार यांच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा देशाच्या, विशेषत: महाराष्ट्राच्या सर्व क्षेत्रांवर जाणवतो. पवार हे केवळ राजकीय नेते नाहीत. त्यांनी विविध क्षेत्रांत आपल्या कार्यक्षमतेच्या, दूरदृष्टीचा आणि लोकाभिमुख प्रकृतीचा परिचय दिलेला आहे. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांच्या प्रभावळीत शोभतील अशी जी मोजकी नावे आज महाराष्ट्रात आहेत, त्यात शरद पवार यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. शाळकरी वयापासूनच चळवळींशी जुळलेल्या व अनोखे सामाजिक भान जपणाऱ्या शरद पवारांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद चार वेळा भूषविले. केंद्रात संरक्षणमंत्री आणि कृषिमंत्री म्हणून त्यांनी उत्कृष्ट कार्य केले. सततची धकाधकी आणि प्रकृतीचे प्रश्न असतानाही राजकारणात त्यांनी प्राप्त केलेले यश अभूतपूर्व म्हणावे लागेल. याशिवाय कृषी क्षेत्राचे जाणकार, आपत्ती व्यवस्थापनात पारंगत, संघटन कौशल्यात निपुण आणि शिक्षण क्षेत्राबद्दल कळकळ असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे. क्रिकेटच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संघटनेला नेतृत्व देणारे शरद पवार ते कबड्डी-खोखोसारख्या देशी खेळींसाठी झोकून काम करणारे पवार, हा जीवनपट विलक्षण आहे.
सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्रातही त्यांनी योगदान दिले. आपल्या सत्तेच्या काळात त्यांनी अनेकांचा विरोध झुगारून प्रगतिशील विचारांची महाराष्ट्राची भूमिका कायम ठेवली आणि तसे निर्णय घेतले. संकटांच्या, आपत्तीच्या प्रसंगी पवारसाहेबांची प्रशासकीय कुशलता महाराष्ट्रानेच नव्हे, तर देशानेही अनुभवलेली आहे. राजकारणात एक विचारधारा स्वीकारावी लागते आणि त्याच वेळी सर्व विचारांशी संवादही ठेवावा लागतो. पवार यांनी सर्व पक्षांत मैत्रभाव जपला. माझा आणि त्यांचा स्नेह वैयक्तिक आणि कौटुंबिक स्वरूपाचा आहे. ऐंशीव्या जन्मदिनानिमित्त त्यांचे अभिष्टचिंतन करताना या लोकनेत्याला परमेश्वराने दीर्घायुरारोग्य द्यावे, एवढीच प्रार्थना!

Web Title: Sharad Pawar: A visionary and people-oriented leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.