राहुल गांधी यांच्याकडेच काँग्रेसचे अध्यक्षपद?; कार्यसमितीची आज बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 12:51 AM2020-08-24T00:51:44+5:302020-08-24T07:04:24+5:30

काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे आता राहुल गांधी यांनी स्वीकारून नेतृत्त्व करावे, अशी मागणी सीडब्ल्यूसी सदस्य अविनाश पांडे यांनी केली. अर्थात पक्ष प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मात्र नेतृत्त्वबदलासाठी अद्याप अधिकृतपणे पक्षातून कळवण्यात आले नसल्याचे सांगितले.

Rahul Gandhi holds the presidency of the Congress ?; Working committee meeting today | राहुल गांधी यांच्याकडेच काँग्रेसचे अध्यक्षपद?; कार्यसमितीची आज बैठक

राहुल गांधी यांच्याकडेच काँग्रेसचे अध्यक्षपद?; कार्यसमितीची आज बैठक

Next

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्ष व संघ परिवाराचा देशात वाढता प्रभाव मान्य करून काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी पक्षाला पूर्णवेळ अध्यक्षांची गरज सोनिया गांधी यांच्याकडे पत्राद्वारे मांडल्यानंतर आता राहुल ब्रिगेड विरूद्ध काही ज्येष्ठ नेते असा नवा वाद रंगला आहे. मात्र पक्षाची धूरा गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीकडे जाता कामा नये, असे बहुसंख्य नेत्यांचे म्हणणे दिसत आहे.

पूर्णवेळ अध्यक्ष ही मागणी रास्त असली तरी गांधी कुटुंबाला पर्याय नाही. काँग्रेसचे नेतृत्त्व गांधी कुटुंबाकडेच असावे, अशी मागणी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह व छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केली आहे. महाराष्ट्रातील बाळासाहेब थोरात यांच्याबरोबरच अन्य राज्यातील नेतेही हीच मागणी करू लागले आहेत. सोनिया गांधी यांना पर्याय राहुल गांधीच मानणारा एक मोठा गट पक्षात असल्याने बिगर गांधी अध्यक्षाची चर्चा मावळण्याची शक्यता आहे. सोमवारी सकाळी होणाऱ्या काँग्रेस कार्य समितीच्या बैठकीत त्याचे पडसाद उमटतील. पक्षाच्या अनेक महत्त्वाच्या निर्णयांवर राहुल गांधी यांचाच प्रभाव असतो. महाराष्ट्रातून दोनदा राज्यसभा सदस्यत्वासाठी प्रदेश काँग्रेस व ज्येष्ठ नेत्यांची इच्छा न जुमानता राहुल गांधी यांनीच उमेदवार निश्चित केला. अनेक राज्यांमध्ये स्थानिक नेत्यांचा निर्णय अमान्य करून राहुल गांधी यांनीच निर्णय घेतल्याची काँग्रेसमध्ये चर्चा आहे. राहुल गांधी यांचा सक्रियतेवरून वारंवार प्रश्न उपस्थित होतात. ते काही वेळा खूप आक्रमक असतात व मध्येच बोलायचे, नेत्यांना भेटायचे बंद करतात, असा आक्षेप आहे. त्यामुळेच काँग्रेसला पूर्णवेळ नेतृत्त्वाची गरज आहे, या नेत्याने लोकांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये मिसळून काम करावे, अशी अपेक्षा पत्रातून व्यक्त करण्यात आली, याकडे सूत्रांनी लक्ष वेधले.

गतवर्षी तत्कालिन राज्यसभा खासदार रजनी पाटील यांनाच पुन्हा संधी देण्यावर सोनिया गांधी यांनी शिक्कामोर्तब केले होते. मात्र ऐनवेळी राहुल गांधी यांनी ज्येष्ठ संपादक कुमार केतकर यांचे नाव निश्चित केले. या वर्षी काँग्रेस सरचिटणीस मुकुल वासनिक यांना राज्यसभा सदस्यत्वाची आशा होती, मात्र राहुल गांधी यांनी राजीव सातव यांच्यावर विश्वास दाखवला.

सलग दोन लोकसभा निवडणुकीत मोठा पराभव, राजस्थान-मध्य प्रदेश काँग्रेस संघटनेतील वाद चव्हाट्यावर आल्यानंतर मोठ्या नेत्यांचा संयम सुटला. माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल, ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक, गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा यांनी पक्षाच्या भवितव्यावर पत्रातून चिंता व्यक्त केली.

पक्षांतर्गत निवडणूक घेण्याची सूचना
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली असून नवा नेत्याची निवड करण्याची सूचना सरचिटणीस के.सी. वेणूगोपाल यांना केली आहे. या पदाचा वर्षभराचा कार्यकाळ पूर्ण केल्याने नव्या अध्यक्षाच्या निवडीसाठी निवडणुकीची तयारी करा, असा आदेशही त्यांनी दिला. कार्यपद्धतीबाबत लिहिलेल्या पत्रानंतरच सोनिया गांधी यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवल्याचे वृत्त लोकमतनेच पहिल्यांदा रविवारी (२३ ऑगस्ट) दिले होते.

जवळपास २३ पेक्षा जास्त नेत्यांनी पक्षनेतृत्त्वात बदलाची मागणी करणारे पत्र सोनिया गांधी यांना लिहिले होते. सूत्रांच्या माहितीनुसार कार्यसमिती सदस्यांनाही कार्यकाळ पूर्ण झाला असून मी राजीनामा देत असल्याचे सांगावे, असे सोनिया गांधी यांनी प्रमुख नेत्यांना सांगितले. या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्य समितीची उद्या ११ वाजता व्हर्च्युअल बैठक होत आहे.

काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे आता राहुल गांधी यांनी स्वीकारून नेतृत्त्व करावे, अशी मागणी सीडब्ल्यूसी सदस्य अविनाश पांडे यांनी केली. अर्थात पक्ष प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मात्र नेतृत्त्वबदलासाठी अद्याप अधिकृतपणे पक्षातून कळवण्यात आले नसल्याचे सांगितले. सोनिया गांधी यांनी नेतृत्त्वबदलाचे ना वक्तव्य दिले आहे ना कुणाला मुलाखत, अशी प्रतिक्रिया सुरजेवाला यांनी काँग्रेस मुख्यालयाबाहेर दिली.

Web Title: Rahul Gandhi holds the presidency of the Congress ?; Working committee meeting today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.