-विश्वास पाटीलदक्षिण महाराष्ट्रात सधन आणि दुष्काळी असे दोन्ही पट्टे येतात. कोल्हापूर, हातकणंगले, सातारा आणि सांगली लोकसभा मतदारसंघावर ऊस उत्पादक आणि साखर कारखानदारांचा दबदबा आहे. मात्र, त्यांच्याच समस्यांकडे ना सरकारने म्हणावे तसे लक्ष दिले, ना स्थानिक लोकप्रतिनिधींनी, यामुळे त्यांच्या समस्या कायम आहेत. सातारा, तसेच सांगलीचा पूर्वभाग दुष्काळी पट्ट्यात मोडतो. तेथे यंदा भीषण दुष्काळ आहे. तेथील जनतेसमोर तीव्र पाणीटंचाई, रोजगाराची समस्या भयावह आहे. वस्त्रोद्योग गेल्या पाच वर्षांत रसातळाला गेल्यासारखी स्थिती आहे. याशिवाय उद्योजक, छोटे व्यावसायिक मंदीच्या झळा सोसत असल्याने त्यांच्यासमोरील समस्याही गंभीर आहेत. मात्र, या सर्व समस्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातून हद्दपार झाल्यासारखी स्थिती सध्या आहे. पक्षीय, गटातटाचे राजकारण, वैयक्तिक हेवेदावे यांचाच प्रचारात वारेमाप उल्लेख होताना दिसतो आहे.भाजपने यंदा कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघांत दुरंगी आणि गेल्या दीड दशकातील पारंपरिक विरोधी उमेदवारांमध्येच या वेळेलाही लढत होत आहे. राष्ट्रवादीकडून खासदार धनंजय महाडिक व शिवसेनेकडून संजय मंडलिक यांच्यात अटीतटीचा सामना होत आहे. हातकणंगले मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी विरुद्ध शिवसेनेचे धैर्यशील माने यांच्यात लढत होत आहे. शेट्टी हे देशपातळीवरील शेतकरी चळवळीचे नेते असल्याने त्यांना मतदारसंघातून कितपत राजकीय बळ मिळते, याकडे देशाचे लक्ष आहे.कोल्हापुरात धनंजय महाडिक यांना पक्षांतर्गत व आघाडीअंतर्गत नाराजीचाच सामना मुख्यत: करावा लागत आहे. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील हे ‘आपलं ठरलंय..’ ही कॅचलाईन घेऊन महाडिक यांच्या पराभवासाठी मैदानात उतरले आहेत. खासदार म्हणून महाडिक यांनी लोकसभेत उत्तम छाप पाडली आणि उमेदवार म्हणूनही ते उजवे असले तरी मागच्या पाच वर्षांत राष्ट्रवादीसह काँग्रेसच्या विरोधात घेतलेल्या उघड भूमिकेने त्यांच्यासमोर अडचणी आल्या आहेत. महाडिक यांच्या विरोधात शिवसेनेकडून संजय मंडलिक रिंगणात आहेत. त्यांच्यावर मुख्यत: ‘अकार्यक्षम उमेदवार’ अशी टीका केली जात आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची महाडिक यांच्याशी जवळीक होती. मात्र, युती झाल्यानंतर ते मंडलिक यांच्या प्रचारात हिरिरीने उतरल्याचे दिसत आहे.>शेट्टींविरोधात हवा निर्माण करण्याचा प्रयत्नहातकणंगलेत शेट्टी यांच्यामागे शेतकऱ्यांचे बळ आहे. ‘चळवळीतील नेता’ अशी त्यांची प्रतिमा आहे. शिवसेनेचे धैर्यशील माने यांच्यामागे शिवसेनेइतकेच किंबहुना त्यांच्याहून जास्त भाजपचे बळ आहे. भाजपने शेट्टी यांच्या पराभवाचा विडा उचलला आहे. त्यामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी अनेक जोडण्या लावून तिथे हवा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. शेट्टी यांनी आजपर्यंतच्या वाटचालीत राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीकेचा भडिमार केला आणि आज तेच शेट्टी शरद पवार यांच्या मांडीला मांडी लावून कसे बसतात, अशी विचारणा त्यांना केली जात आहे.>पित्यानंतर पुत्राविरुद्धमात्र पक्षांचा उलटफेरराष्ट्रवादीचे विद्यमान खासदार धनंजय महाडिक हे २००४ च्या निवडणुकीत त्यावेळी राष्ट्रवादीचे खासदार असलेल्या सदाशिवराव मंडलिक यांच्याकडून पराभूत झाले होते. महाडिक त्यावेळी शिवसेनेचे उमेदवार होते. आता चित्र उलटे झाले आहे. मंडलिक यांचे चिरंजीव संजय मंडलिक हे शिवसेनेचे, तर महाडिक राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. मंडलिक-महाडिक या दोन घराण्यांच्या लढतीतील प्रत्येकी एक लढत दोघांनीही जिंकली आहे.>राजू शेट्टींची लढत मातेनंतर पुत्राविरुद्धहातकणंगले मतदारसंघात २००९च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तत्कालीनखासदार निवेदिता माने यांचा पराभव स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांनी केला होता. यंदा माने यांचा मुलगा धैर्यशील हा शिवसेनेकडून रिंगणात उतरला आहे व त्यांची लढत राष्ट्रवादी आघाडी पुरस्कृत उमेदवार राजू शेट्टी यांच्याशी होत आहे.
समस्या अपरंपार; प्रचारातून हद्दपार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 04:49 IST