राहुल गांधीच्या नागरिकत्वास अपक्ष उमेदवाराचा आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 06:24 AM2019-04-21T06:24:26+5:302019-04-21T06:24:52+5:30

निवडणूक अधिकारी सोमवारी करणार तपासणी

Opposition of Independent Candidate Rahul Gandhi's Citizenship | राहुल गांधीच्या नागरिकत्वास अपक्ष उमेदवाराचा आक्षेप

राहुल गांधीच्या नागरिकत्वास अपक्ष उमेदवाराचा आक्षेप

Next

नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेठीमधून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी भरलेल्या उमेदवारी अर्जासोबत केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये नागरिकत्व आणि शैक्षणिक अर्हतेविषयी दिलेल्या माहितीस अपक्ष उमेदवाराने आक्षेप घेतला असून त्या कारणावरून गांधी यांचा अर्ज फेटाळायचा की नाही यावर निवडणूक निर्णय अधिकारी येत्या सोमवारी सुनावणी घेणार आहेत.

राहुल यांनी आपण भारतीय नागरिक असल्याचे नमूद केले आहे. पण २००४ मध्ये त्यांनी एका ब्रिटिश कंपनीत गुंतवणूक केली. या कंपनीच्या अहवालात राहुल गांधी ब्रिटिश नागरिक असल्याचा उल्लेख आहे. याआधीच्या दोन निवडणुकांच्या वेळी त्यांनी आपली शैक्षणिक अर्हता उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण व बी.ए. अशी दिली होती. आताच्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपण केंब्रिज विद्यापीठाचे एम. फिल असल्याचे म्हटले आहे, असा अपक्ष उमेदवाराचा आक्षेप आहे. हा मुद्दा उचलून धरत भाजपचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिंह राव यांनीही राहुल गांधीं यांच्यावर हल्लाबोल केला.

इथे साक्षीपुराव्याचा प्रश्नच उद्भवत नाही
निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितले की, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यापुढे जेव्हा असे आक्षेप घेतले जातात तेव्हा त्याने सखोल चौकशी करून साक्षीपुरावे तपासून पाहणे अपेक्षित नसते. तेथील सुनावणी ‘समरी’ स्वरूपाची असते. त्यात जो निर्णय होतो त्याविरुद्ध निवडणूक झाल्यानंतर उच्च न्यायालयात याचिका करणे हाच मार्ग आक्षेप घेणाºयापुढे असतो.

Web Title: Opposition of Independent Candidate Rahul Gandhi's Citizenship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.