रिहाना? कोण बाई आहे ती? आणि सरकार तिला उत्तर का देतंय?: राज ठाकरेंचा भाजपवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2021 03:20 PM2021-02-06T15:20:23+5:302021-02-06T15:30:38+5:30

raj thackeray : शेतकरी आंदोलनावरुन सेलिब्रिटींच्या ट्विटवर वॉरवर राज ठाकरे बोलले.

mns chief raj thackeray attacks bjp over farmers protest tweet controversy | रिहाना? कोण बाई आहे ती? आणि सरकार तिला उत्तर का देतंय?: राज ठाकरेंचा भाजपवर हल्ला

रिहाना? कोण बाई आहे ती? आणि सरकार तिला उत्तर का देतंय?: राज ठाकरेंचा भाजपवर हल्ला

Next

दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरुन सुरू असलेल्या ट्विटर वॉरवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी भाष्य केलं आहे. केंद्र सरकारने देशातील प्रतिष्ठीत व्यक्तींना अशाप्रकारचं ट्विट करायला लावू नये, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. यावेळी राज यांनी ज्या पॉप सिंगरच्या ट्विटमुळे हा वाद सुरू झाला त्या रिहानावरही जोरदार टीका केली. ( raj thackeray attacks bjp over farmers protest tweet controversy)

"कोण कुठली रिहाना? कोण बाई आहे ती? तिला का इतकं महत्वं दिलं जातंय? तिनं ट्विट करायच्याआधी तिला कुणी ओळखत तरी होतं का? आणि अशा व्यक्तीनं ट्विट केल्यानंतर आपल्या देशातील भारतरत्नांना सरकारनं ट्विट करायला लावणं हे बरोबर नाही", असं राज ठाकरे म्हणाले. 

भाजपनं आंदोलन करायची गरज नाही
कृषी कायद्यांना होणारा विरोध पाहून  सत्ताधारी भाजपनं आंदोलन करण्याची काहीच गरज नाही. तुम्ही सत्तेत आहात. दिल्लीत बसून तुम्हीच निर्णय घेत आहात मग तुम्हीच आंदोलन का करताय?, असा सवाल राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. 

पंतप्रधानांनी एक फोन करुन विषय मिटवावा
"कृषी कायदे फायद्याचे आहेत. पण ते फक्त एक-दोघांसाठी फायदेशीर ठरू नयेत इतकंच लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळे कृषी मंत्री आणि आंदोलकांमध्ये चर्चेनं तोडगा निघत नसेल. मग पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना एक फोन करुन विषय मिटवून टाकावा", असं राज ठाकरे म्हणाले. 

"मी भाषण केलं, पण मला गुन्हा मान्य नाही", राज ठाकरेंना वाशी न्यायालयाकडून जामीन मंजूर

"शेतकरी आज इतक्या थंडीत तिथं आंदोलन करतोय. आणखी किती दिवस हे प्रकरण चिघळवणार. त्यामुळे केंद्र आणि राज्यांनी शेतकऱ्यांसोबत एकत्र बसावं आणि प्रश्न सोडवावा", असंही ते पुढे म्हणाले. 

निवडणूक आली की नामांतर आठवतं का?
"केंद्र आणि राज्यात जेव्हा शिवसेना-भाजपचं सरकार होतं त्यावेळ औरंगाबादचं संभाजीनगर असं नामकरण का झालं नाही? आता निवडणुकीच्या तोंडावरच हे नामांतराचे विषय कसे निघतात? लोकांना काय मुर्ख समजलात का?", असा रोखठोक सवाल करत राज यांनी औरंगाबादच्या नामांतरणाच्या मुद्द्यावरुन शिवसेना आणि भाजपवर निशाणा साधला. 

शेकडो गुन्हे दाखल केले तरी जनतेसाठी आवाज घुमणारच!, मनसेची रोखठोक भूमिका

"जेव्हा राज्य आणि केंद्रात भाजप-शिवसेनेची सत्ता होती. त्यावेळी औरंगाबाद सोडून इतर अनेक शहरांची नावं बदलली गेली. दिल्लीतील रस्त्यांचीही नावं बदलण्यात आली. मग त्यावेळी औरंगाबादचं नामांतरण का नाही झालं ते आधी सांगा?", असं राज ठाकरे म्हणाले. 

अयोध्येचा दौरा निश्चित नाही
राज ठाकरे अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर आली होती. पण राज यांनी याबाबत अद्यात कोणताही अधिकृत निर्णय झाला नसल्याचं स्पष्ट केलं. "मी फक्त अयोध्येला जायची इच्छा व्यक्त केली. अद्याप कोणताही दौरा निश्चित झालेला नाही", असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. 
 

Read in English

Web Title: mns chief raj thackeray attacks bjp over farmers protest tweet controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.