नवा वाद! राज्यपालांच्या हवाई प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगी नाकारली; विमानातून उतरावं लागलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 12:46 PM2021-02-11T12:46:29+5:302021-02-11T13:02:54+5:30

Bhagat Singh Koshyari : पुन्हा एकदा राज्यपाल आणि राज्य सरकारमध्ये नवा वाद उफाळून आला आहे.

maharashtra government denied permission for the governor Bhagat Singh Koshyaris air travel to uttarakhand | नवा वाद! राज्यपालांच्या हवाई प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगी नाकारली; विमानातून उतरावं लागलं!

नवा वाद! राज्यपालांच्या हवाई प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगी नाकारली; विमानातून उतरावं लागलं!

googlenewsNext

राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्यातील वाद काही शमण्याची चिन्ह दिसत नाहीत. आता पुन्हा एकदा राज्यपाल आणि राज्य सरकारमध्ये नवा वाद उफाळून आला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हवाई प्रवासालाच मुख्यमंत्री कार्यालयानं परवानगी दिली नसल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब अशी की राज्यपाल कोश्यारी विमानात बसल्यानंतर त्यांना परवानगी नाकारण्यात आल्याचं कळालं आणि त्यांना विमानातून उतरुन राजभवनात परतावं लागलं अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. (maharashtra government denied permission for the governor Bhagat Singh Koshyaris air travel to uttarakhand)

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आज नियोजित कार्यक्रमानुसार उत्तराखंडसाठी निघणार होते. त्यानुसार ते सरकारी विमानातही बसले. पण मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रवासाला अद्याप परवानगीच देण्यात आली नसल्याचं समोर आलं. त्यामुळे राज्यपालांना विमानातून खाली उतरुन पुन्हा राजभवानात परतावं लागल्याचं सांगण्यात येत आहे. 

नेमकं काय घडलं?
उत्तराखंडमधील मसूरी येथे लालबहादुर शास्त्री अकादमीच्या आयएएस अधिकाऱ्यांच्या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी उपस्थित राहणार होते, त्यासाठी राज्यपाल सरकारी विमानाने मुंबई विमानतळावरून रवाना होणार होते, तत्पूर्वी सरकारी विमान वापरण्यासाठी राजभवनाकडून रितसर सामान्य विभाग प्रशासनाला परवानगीसाठी कळवण्यात आलं होतं. २ फेब्रुवारी रोजीच याबाबतचं पत्र सामान्य विभाग प्रशासनाला पाठविण्यात आलं होतं. परंतु शेवटच्या क्षणापर्यंत ही परवानगी देण्यात आली नाही. राज्यपालांसह राजभवनाचे अधिकारी १५ मिनिटं विमानात बसून होते, तरीही परवानगी न मिळाल्याने अखेर राज्यपाल विमानातून उतरले, त्यानंतर राज्यपालांसाठी स्पाइस जेटचं व्यावसायिक विमानाची व्यवस्था करण्यात आली, १२.१५ मिनिटांनी त्यांचे विमान देहरादूनसाठी रवाना झालं, देहरादूनपर्यंत राज्यपाल विमानाने प्रवास करतील त्यापुढे मसूरीपर्यंत राज्यपाल वाहनाने जातील, आणि उद्या होणाऱ्या कार्यक्रमाला हजेरी लावतील अशी माहिती लोकमत ऑनलाइनच्या सूत्रांनी दिली आहे. 

मात्र या घडलेल्या प्रकाराला जबाबदार कोण याची चर्चा सध्या सुरू आहे, कारण सामान्य प्रशासन विभाग हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अख्यारित येते, तसेच राजशिष्टाचार विभागाची जबाबदारी आदित्य ठाकरेंकडे आहे, त्यामुळे विरोधकांनी आता सत्ताधारी शिवसेनेला टार्गेट करण्यात सुरुवात केली आहे.

राज्यपालांना विमानातून उतरवलं, जनता सरकारला सत्तेतून खाली उतरवेल - सुधीर मुनगंटीवार 

दरम्यान, या संपूर्ण प्रकाराबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारण्यात आलं असता त्यांनी याबाबत कोणतीही माहिती नसल्याचं सांगितलं. तसंच मंत्रालयात गेल्यानंतर यासंबंधिची माहिती घेईन, असं अजित पवार म्हणाले. दुसरीकडे भाजप नेते गिरीश महाजन यांनी राज्य सरकारच्या या कृत्यावर नाराजी व्यक्त केली. राज्यपालांनी दोन आठवड्यांपूर्वीच या प्रवासासाठीची कल्पना मुख्यमंत्री कार्यालयाला दिली होती. पण ऐनवेळी त्यांना प्रवास नाकारण्यात आला हे अतिशय दुर्देवी बाब असल्याचं ते गिरीष महाजन म्हणाले आहेत.

Web Title: maharashtra government denied permission for the governor Bhagat Singh Koshyaris air travel to uttarakhand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.