“प्रश्न खूप पण निर्णयांचा अभाव”; राज ठाकरेंनी घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट

By प्रविण मरगळे | Published: October 29, 2020 11:10 AM2020-10-29T11:10:16+5:302020-10-29T11:12:50+5:30

Raj Thackeray meet Governor Bhagat Singh Koshyari News: प्रश्न खूप आहेत, पण त्याबाबत काही तरी निर्णय घेणं गरजेचं आहे, एक दोन दिवसात या विषयावर निर्णय घ्यावा, पण सरकारचे आणि राज्यपालांचे एकूण सगळं बघता, तो निर्णय होईल का याबाबत साशंकता आहे.

"Lots of questions but lack of decisions"; Raj Thackeray meet on Governor Bhagat Singh Koshyari | “प्रश्न खूप पण निर्णयांचा अभाव”; राज ठाकरेंनी घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट

“प्रश्न खूप पण निर्णयांचा अभाव”; राज ठाकरेंनी घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट

Next
ठळक मुद्देवीजबिल कमी करू शकतो असं कंपन्यांचे म्हणणं आहे पण राज्य सरकारकडून यावर निर्णय होत नाहीकोणतीही गोष्ट सांगितली तर त्यावर काम सुरु आहे असं उत्तर मिळतं पण निर्णय होत नाहीलॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले, वीजबिल भरमसाठ येत आहेत, लोक बिल कुठून भरणार?

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली, या भेटीत वाढील वीज बिल आणि दूध दरवाढ या दोन मुद्द्यावर प्रामुख्याने राज ठाकरेंनी राज्यपालांशी चर्चा केली. वाढीव वीज बिलासंदर्भात सरकारने तातडीने जनतेला दिलासा द्यावा, याबाबत गरज पडल्यास मुख्यमंत्री, शरद पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचं राज ठाकरेंनी सांगितले.

यावेळी राज ठाकरे म्हणाले की, रस्त्यावर वाहतूक कोंडी वाढली, ट्रेन कधी सुरु होणार, रेस्टॉरंट उघडली आहेत, मंदिरं सुरु नाहीत, धरसोडपणा सोडून कधी काय होणार आहे ते सांगावं, लोकांना जिथे २ हजार बिल येत होतं तिथे १० हजार बिले येतंय, लोकांना वीजबिलाचा मोठा फटका बसतोय, राज्य सरकारला या विषयाशी कल्पना आहे. लवकरात लवकर या समस्येवर तोडगा निघावा, याबाबत लवकरच शरद पवार यांच्याशी बोलणार आहे, गरज पडल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही भेटणार आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच प्रश्न खूप आहेत, पण त्याबाबत काही तरी निर्णय घेणं गरजेचं आहे, एक दोन दिवसात या विषयावर निर्णय घ्यावा, पण सरकारचे आणि राज्यपालांचे एकूण सगळं बघता, तो निर्णय होईल का याबाबत साशंकता आहे. वीजबिलाचा विषय मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलन करतायेत. वीजबिल कमी करू शकतो असं कंपन्यांचे म्हणणं आहे पण राज्य सरकारकडून यावर निर्णय होत नाही. राज्य सरकारने तात्काळ वीजबिलासंदर्भात निर्णय घ्यायला हवा. कोणतीही गोष्ट सांगितली तर त्यावर काम सुरु आहे असं उत्तर मिळतं पण निर्णय होत नाही, लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले, वीजबिल भरमसाठ येत आहेत, लोक बिल कुठून भरणार? बिल नाही भरलं तर वीज कापणार त्यामुळे सरकारने यावर लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे.



 

दरम्यान, रेल्वे सुरु होत नाही, ११ वीचे प्रवेश रखडले, रस्त्यावर सगळीकडे वाहतूक कोंडी दिसतेय, लोकल सुरु नाही, हॉटेल सुरु झाले मंदिरे सुरु झाली नाही, सरकारने या सर्व गोष्टींचा एकदा खुलासा करणं गरजेचे आहे. प्रश्नांची कमतरता नाही पण निर्णयाची कमतरता आहे, कुंथत कुंथत सरकार चालवता येत नाही, कधी काय सुरु होणार हे सरकारने एकदा सांगावे अशा शब्दात राज ठाकरेंनी राज्य सरकारला फटकारलं आहे.

शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दूध दरात वाढ करा

आज दूध संकलन करणाऱ्या मोठ्या संस्था शेतकऱ्याला एका लिटरमागे १७ ते १८ रुपये देतात पण स्वत: मात्र भरघोस नफा कमवतात. कधी सुका दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ यामुळे आधीच शेतकरी गांजलेला असतो, मात्र वाढत्या महागाईमुळे गुरांची देखभालदेखील खूप महाग झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्याला एका लिटरमागे किमान २७ ते २८ रुपये मिळायला हवे आणि यासाठी राज्य सरकारने लक्ष घालावे

वाढीव वीजबिलांनी सर्वसामान्यांना शॉक

लॉकडाऊनदरम्यान ग्राहकांना पाठवलेली वाढीव वीजबिलं, आधीच उदरनिर्वाहाची साधन बंद, त्यात मुंबईसारख्या ठिकाणी रेल्वे ७ महिने बंद असल्याने अनेकांनी रोजगार गमावला आहे. अनेक आस्थापने बंद आहेत, अशा परिस्थितीत वीज बिलांनी दिलेला शॉक जबरदस्त आहे. सरकारने वीज ग्राहकांना गेल्या महिन्यांच्या वीजबिलातील वाढीव रक्कम लोकांना परत करायला हवी. या दोन्ही विषयाबाबत राज्यपालांनी सरकारला सूचना द्याव्यात अशी विनंती मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना निवेदनाद्वारे केली आहे.  

Read in English

Web Title: "Lots of questions but lack of decisions"; Raj Thackeray meet on Governor Bhagat Singh Koshyari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.