- सचिन लुंगसे मुंबई : उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी आणि काँग्रेसच्या उमेदवार ऊर्मिला मातोंडकर यांच्यात प्रमुख लढत आहे. मात्र हे दोन्ही उमेदवार पदवीधर नाहीत. शेट्टी यांचे शिक्षण सातवीपर्यंत झाले आहे. तर मातोंडकर यांचे शिक्षण एसवायबीएपर्यंत झाले आहे. उर्वरित उमेदवारांपैकी एक उमेदवार पीचडी, एक उमेदवार एमबीए आणि एक उमेदवार टेक्निकल क्षेत्रातील शिक्षण घेतलेला आहे.लोकसभा असो, विधानसभा असो, पालिकांसारख्या निवडणुका असो. अशा निवडणुकांमध्ये आपल्या मतदारसंघातील उमेदवार उच्च शिक्षित असावा, अशी आशा मतदारांना असते.मात्र एखाददुसरा उमेदवार वगळला तर उर्वरित उमेदवारांचे शिक्षण एसएससीच्या पुढे जात नाही. परिणामी मतदारांचा हिरमोड होतो. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून शेट्टी आणि मातोंडकर यांच्यातच प्रमुख लढत असून, हे दोघेही उच्च शिक्षित नसले तरी ऊर्मिला यांना बॉलीवूडचे वलय आहे आणि शेट्टी कार्यकर्त्यापासून खासदार झाले आहेत. या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत.>हे आहे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील वास्तवउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात तीन उमेदवार पदव्युत्तर आहेत. दोघांकडे पदवी आहे. बारावी चार जण आहेत. दहावी एक जण आहे. वाणिज्य, कला, पीचडी आणि एमबीएचेही उमेदवार येथे आहेत. ज्या दोघांमध्ये चुरस आहे त्या दोन उमेदवारांपैकी एकाही उमेदवाराकडे पदवी नाही; हे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील वास्तव आहे.
गोपाळ शेट्टी सातवी, ऊर्मिलाकडेही पदवी नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 01:53 IST