फोकस नंदीग्राम; ममतांसाठी प्रतिष्ठेची लढत, भाजपकडून संपूर्ण ताकद पणाला; १ एप्रिल रोजी मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 09:11 AM2021-03-31T09:11:24+5:302021-03-31T09:11:33+5:30

पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील नंदीग्राम येथे सर्वात हायप्रोफाईल लढत होत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या तेथून लढत असून, त्यांच्यासमोर तृणमूलचे माजी नेते व आता भाजपचे उमेदवार असलेले शुभेंदू अधिकारी यांचे तगडे आव्हान आहे.

Focus Nandigram; Fight for prestige for Mamata, full strength from BJP; Voting ends April 1 | फोकस नंदीग्राम; ममतांसाठी प्रतिष्ठेची लढत, भाजपकडून संपूर्ण ताकद पणाला; १ एप्रिल रोजी मतदान

फोकस नंदीग्राम; ममतांसाठी प्रतिष्ठेची लढत, भाजपकडून संपूर्ण ताकद पणाला; १ एप्रिल रोजी मतदान

Next

नंदीग्राम : पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील नंदीग्राम येथे सर्वात हायप्रोफाईल लढत होत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या तेथून लढत असून, त्यांच्यासमोर तृणमूलचे माजी नेते व आता भाजपचे उमेदवार असलेले शुभेंदू अधिकारी यांचे तगडे आव्हान आहे. बंगालच्या राजकारणात या लढतीला दीदी विरुद्ध दादा असे संबोधल्या जात असून, दोन्ही पक्षांसाठी ही प्रतिष्ठेची लढत झाली असून, १ एप्रिल रोजी दोन्ही उमेदवारांचे भाग्य ईव्हीएममध्ये बंद होईल.
मागील निवडणुकीत ममता यांनी भवानीपूर येथून निवडणूक जिंकली होती. मात्र यावेळेस त्यांनी नंदीग्राममधून उभे राहण्याचा निर्णय घेतला. 
तृणमूलमधील त्यांचे एकेकाळचे विश्वासू सहकारी शुभेंदू अधिकारी यांना भाजपने त्या जागेवरून मैदानात उतरवले. नंदीग्राम व आजूबाजूच्या भागात अधिकारी कुटुंबीयांचा अनेक वर्षांपासून दबदबा आहे. त्यांचे वडील शिशिर अधिकारी हे तीनवेळा तेथून खासदार होते व संपुआ सरकारमध्ये मंत्रीदेखील होते. स्वतः शुभेंदू १९९५ पासून राजकारणात सक्रिय आहेत. २००६ मध्ये ते तृणमूलच्या तिकिटावरून कंथी येथून जिंकून आले होते. तर २००९ व २०१४ मध्ये ते लोकसभेत निवडून गेले होते. २०१६ च्या निवडणुकीत नंदीग्राममधून ते जिंकले होते. अधिकारी कुटुंबामुळेच संबंधित भागात तृणमूलला बळकटी मिळाली होती. 
या जागेवरून ममता लढत असल्या तरी प्रत्यक्षात त्या प्रचाराला पूर्णवेळ देऊ शकल्या नव्हत्या. मात्र या लढतीचे महत्त्व लक्षात घेता, मागील काही दिवसापासून त्यांच्यासह तृणमूलचे मोठे नेते या भागात प्रचार करत आहेत. तर अधिकारी यांच्या प्रचारासाठी गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक मोठे नेते उतरले. 

नंदीग्राममुळे ममतांचा वाढला जनाधार
n२००७ साली नंदीग्राममध्ये तृणमूलतर्फे भूमी अधिग्रहण विरोधातील आंदोलन पुकारण्यात आले होते. या आंदोलनानंतर ममतांचा जनाधार वाढला होता. अधिकारी कुटुंबीयांनी त्यात मोठी भूमिका पार पाडली होती. 
n१४ वर्षांनंतर त्याच अधिकारी कुटुंबातील सदस्याविरोधात ममतांना निवडणूक लढवावी लागत आहे. या निवडणूक प्रचाराच्या सुरुवातीला नंदीग्राम येथेच ममता यांचा अपघात झाला व त्यांच्या पायाला दुखापत झाली. त्यानंतर त्या व्हीलचेअरवरूनच प्रचार करत आहेत. भाजपनेच हा हल्ला केल्याचा त्यांनी आरोप केला होता. 

माजी क्रिकेटपटू अशोक डिंडावर प्रचारादरम्यान हल्ला
मोयना : भारताचा माजी वेगवान गोलंदाज व मोयना येथून भाजप उमेदवार अशोक डिंडावर प्रचारादरम्यान हल्ला करण्यात आला. रोड शोदरम्यान हा हल्ला झाला. निवडणूक आयोगाने या हल्ल्याची दखल घेतली असून, जिल्हा प्रशासनाकडून तातडीने अहवाल मागितला आहे. मोयना बाजार येथे रोड शो सुरू असताना सायंकाळी ४.३० च्या सुमारास काही गुंडांनी लाठी व रॉडने हल्ला केला. त्यांनी डिंडाच्या वाहनावर दगडफेकदेखील केली. या हल्ल्यात डिंडाला खांद्यावर जखम झाली. हल्ला करणाऱ्यांमध्ये तृणमूलच्या कार्यकर्त्यांचा समावेश होता, असा आरोप दिंडाच्या प्रचार चमूकडून लावण्यात आला आहे. तृणमूलने यात त्यांच्या कार्यकर्त्यांचा हात असल्याच्या आरोपांचे खंडन केले आहे. 

युवकाच्या कानशिलात; बाबूल सुप्रियो वादात 
कोलकाता : केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री बाबूल सुप्रियो हे एका नव्या वादात सापडले आहेत. टॉलीगंज विधानसभेच्या जागेवरून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सुप्रियो यांनी पक्षाच्या कार्यालयातच एका व्यक्तीच्या कानशिलात लगावल्याचा आरोप करण्यात येत आहे. संबंधित व्हिडीओ व्हायरल झाला असून, भाजपकडून असे झालेच नसल्याचा दावा करण्यात येत आहे.  
पश्चिम बंगालच्या निवडणुकीसाठी भाजपने पूर्ण ताकद पणाला लावली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य असूनदेखील सुप्रियो यांना राज्याच्या राजकारणात परत आणले आहे. पक्षाच्या कार्यालयात नेते व कार्यकर्ते यांचा संवाद सुरूच असतो. राणीकोठी येथील पक्ष कार्यालयात डोलजत्रा उत्सव सुरू असताना,  एका व्यक्तीने सुप्रियो यांना टीव्हीवर मुलाखती देण्याऐवजी प्रत्यक्ष तळागाळात जाऊन प्रचार करण्यावर भर द्यावा, असा सल्ला दिला. ते  ऐकून सुप्रियो यांचा पारा चढला व त्यांनी संबंधित युवकाच्या कानशिलात लगावली असे व्हिडिओत दिसत आहे. 

दुसऱ्या टप्प्याचा 
प्रचार संपला
nनिवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार मंगळवारी सायंकाळी संपला. दुसऱ्या टप्प्यात १ एप्रिल रोजी चार जिल्ह्यांतील ३० जागांवर मतदान होईल. 
nया टप्प्यात ७५,९४ हजार ५४९ मतदार असून १७१ उमेदवार रिंगणात आहेत. १०,६२० मतदान केंद्रे सज्ज करण्यात आली आहेत. हिंसा होऊ नये यासाठी ‘सीएपीएफ’च्या ६५१ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. 

Web Title: Focus Nandigram; Fight for prestige for Mamata, full strength from BJP; Voting ends April 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.