प. बंगालमध्ये कोणाची सत्ता येणार? ममता की भाजपा; जाणून घ्या जनमताचा कौल...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2021 05:05 AM2021-03-01T05:05:44+5:302021-03-01T05:06:03+5:30

जनमत चाचणीचा अंदाज, पुडुचेरीमध्ये सत्तांतराचा अंदाज

Despite the reduction in seats, Mamata's rule in Bengal | प. बंगालमध्ये कोणाची सत्ता येणार? ममता की भाजपा; जाणून घ्या जनमताचा कौल...

प. बंगालमध्ये कोणाची सत्ता येणार? ममता की भाजपा; जाणून घ्या जनमताचा कौल...

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
नवी दिल्ली : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचीच सत्ता कायम राहणार असल्याचा अंदाज एबीपी-सी व्हाेटर यांच्या जनमत चाचणीतून व्यक्त करण्यात आला आहे. मार्च आणि एप्रिलमध्ये हाेणाऱ्या चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत तीन राज्यांमध्ये सत्ता कायम राहणार असून, तामिळनाडू आणि पुडुचेरीमध्ये सत्तांतराचा अंदाज या चाचणीतून व्यक्त करण्यात आला आहे. 


भारतीय जनता पार्टीसाठी पश्चिम बंगाल येथील निवडणूक खूप प्रतिष्ठेची आहे. तेथे ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काॅंग्रेससाेबत थेट टक्कर आहे. मात्र, जनमत चाचणीनुसार सत्ता ममतांच्याच पारड्यात जाणार आहे. पश्चिम बंगालमध्ये २९४ जागांपैकी तृणमूल काॅंग्रेसला १४८ ते १६४ जागा मिळतील, असा अंदाज आहे. ममतांना भाजपकडून यंदा कडवे आव्हान मिळणार असून, भाजपच्या वाट्याला ९२ ते १०८ जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. काॅंग्रेस आणि डाव्या पक्षांच्या आघाडीला ३१ ते ३९ जागा मिळू शकतात. तृणमूल काॅंग्रेसला ४३ टक्के, भाजपला ३८ टक्के, तर काॅंग्रेस आणि डाव्या पक्षांच्या आघाडीला १३ टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. गेल्या निवडणुकीत ममतांना २११ जागा मिळाल्या हाेत्या. मात्र, यंदा सत्ता कायम राखण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असला, तरीही माेठ्या प्रमाणात जागा घटण्याची शक्यता आहे. हीच स्थिती काॅंग्रेस आणि डाव्या आघाडीबाबत आहे. गेल्यावर्षी बिहारमध्ये झालेल्या निवडणुकीनंतर भाजपने प. बंगालकडे मार्चा वळविला हाेता. भाजपने २०० हून अधिक जागा मिळतील, असा दावा केला आहे. 

आसाममध्ये भाजपच 
जनमत चाचणीनुसार आसाममध्ये भाजपचीच सत्ता येईल, असा अंदाज आहे. आसाममधील १२६ जागांपैकी एनडीएला ६८ ते ७६ जागा मिळण्याचा अंदाज आहे. काॅंग्रेसच्या महाआघाडीला ४३ ते ५१ जागा मिळण्याची शक्यता आहे.

केरळमध्ये सत्ताधाऱ्यांनाच काैल
केरळमध्ये सत्ताधाऱ्यांनाच पुन्हा संधी मिळणार आहे, असा जनमत चाचणीचा अंदाज आहे. केरळमध्ये सत्ताधारी डाव्या आघाडीला १४० पैकी ८३ ते ९१ जागा मिळण्याची शक्यता आहे, तर काॅंग्रेसच्या नेतृत्वातील आघाडीला ४७ ते ५५ जागा मिळतील, असा अंदाज आहे. भाजपला मात्र केवळ ० ते २ जागा मिळतील, अशी शक्यता आहे. पुडुचेरीमध्येही सत्ता परिवर्तन हाेण्याचा अंदाज आहे. या ठिकाणी एकूण ३० जागांपैकी ‘एनडीए’ला १७ ते २१ जागा मिळण्याची शक्यता आहे, तर काॅंग्रेस आघाडीला ८ ते १२ जागा मिळतील, असा अंदाज आहे. 

तामिळनाडूत सत्ता परिवर्तन
तामिळनाडूमध्ये सत्ता परिवर्तन हाेण्याचा अंदाज आहे. एकूण २३४ जागांपैकी सत्ताधारी ‘एआयएडीएमके’ आघाडीला ५८ ते ६६ जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर ‘डीएमके’ १५४ ते १६२ जागा मिळवून सत्ता स्थापन करेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. माजी मुख्यमंत्री जयललिता आणि करुणानिधी यांच्या निधनानंतर हाेत असलेली ही पहिलीच निवडणूक आहे. त्यासाठी ‘डीएमके’चे नेते एम. के. स्टॅलीन यांनी काॅंग्रेससाेबत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला माेठे यश मिळेल, असा अंदाज आहे. 

Web Title: Despite the reduction in seats, Mamata's rule in Bengal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.